Kolhapur: वाठार येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी, गाव बंद ठेवून निषेध; नेमकं प्रकरण काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:07 IST2025-08-12T12:07:14+5:302025-08-12T12:07:43+5:30
१५ ऑगस्टपासून साखळी उपोषणाचा इशारा

Kolhapur: वाठार येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी, गाव बंद ठेवून निषेध; नेमकं प्रकरण काय.. वाचा
नवे पारगाव : वाठार तर्फ वडगावच्या (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळास साडेसात एकर जमीन दिल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शासनाच्या आदेशाची होळी केली. या निर्णयाच्या विरोधात ग्रामपंचायतीसमोर १५ ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला.
वाठारच्या गट नं. ११३ ''ब''मधील सुमारे ३३ आर. क्षेत्र मालकी हक्काने, तर क्रीडांगणासाठी सुमारे २ हेक्टर ६६ आर. तीस वर्षे भाडेपट्ट्याने अशी सुमारे साडेसात एकर जमीन जिल्हाधिकारी यांनी अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळास दिली आहे. गावच्या विकासाच्या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीने मागणी केली असूनही ही जागा संस्थेला देण्यात आली. याविरोधात ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत आदेशाची होळी केली.
मोर्चाचे नेतृत्व सरपंच सचिन कांबळे, वारणा दूध संघांचे संचालक महेंद्र शिंदे, युवासेनेचे संदीप दबडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे आदींनी केले. यावेळी उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार, रेश्मा शिंदे, रुकसाना नदाफ आदींसह नानासो मस्के, राजहंस भुजिंगे, नाना कुंभार, शरद सांभारे, संतोष वाठारकर, अनिल दबडे, संदीप पाटील, मोहसीन पोवाळे, बी. एस. पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थेसाठी काही जमीन भाडेपट्ट्याने व काही जमीन मालकी हक्काने दिली आहे. हे पूर्णपणे कायदेशीर पध्दतीने झाले आहे. या शैक्षणिक संस्थेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पण, केवळ व्यक्तीगत आकसापोटी काही हा प्रकार घडवून आणत आहेत. चुकीच्या पध्दतीचा व्यवहार असेल तर कायदेशीर मार्गाने जाण्यास आमची कोणतीही हरकत नाही.- विजयसिंह माने, अध्यक्ष, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप