Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:55 IST2025-04-28T15:54:31+5:302025-04-28T15:55:20+5:30
बिरदेवच्या स्वागताला जनसागर लोटला, ..अन् बिरदेव ढसाढसा रडला..!

Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत
मुरगूड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ५५१ वी रँक मिळवणारा यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे रविवारी मूळगाव यमगेमध्ये आला. बिरदेवच्या यशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी मुरगूडपासून यमगेपर्यंत जंगी मिरवणूक काढली. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाच्या कौतुकासाठी जनसागर लोटला होता. येथील शिवतीर्थपासून सकाळी आठ वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल सहा तास चालली. बिरदेव यांच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बिरदेव व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.
यूपीएससी परीक्षेचा निकाल २२ एप्रिलला दुपारी लागला. त्या दिवशी बिरदेव बेळगावजवळील भवानीनगर येथे माळावर आपल्या मामाच्या बकऱ्यांत रमला होता. गावकऱ्यांनी फोनवरून बिरदेवचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी बिरदेवच्या स्वागताची तयारी सुरू केली, पण बिरदेवने सैन्यात असलेला भाऊ वासुदेव येत नाही, तोपर्यंत गावात येणार नसल्याची इच्छा व्यक्त केली आणि रविवारी बिरदेव भावासह गावात आला आणि ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.
सकाळी बिरदेव कर्नाटकातील झोडकूरळी या आपल्या बहिणीच्या गावाहून मुरगूडमधील शिवतीर्थ येथे दाखल झाला. प्रारंभी औक्षण केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये बिरदेव आपले आई बाळाबाई, वडील सिद्धाप्पा, भाऊ, बिरदेव, बहीण व अन्य नातेवाईक होते. मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती. ही मिरवणूक यमगे एसटी स्टँड येथे आली. यमगेच्या प्रवेशद्वारात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अंबाबाई, डोमरीन व बिरोबा मंदिरांचे दर्शन घेऊन बिरदेवच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली.
बिरदेवच्या कौतुकासाठी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भावासाठी मिरवणूक थांबवली
बिरदेव आपल्या आई-वडील व अन्य नातेवाइकांसह मिरवणुकीसाठी सजवलेल्या जीपमध्ये चढला. मिरवणूक सुरू होणार इतक्यात आपला भाऊ वासुदेव जोपर्यंत गाडीत येत नाही तोपर्यंत बिरदेव यांनी मिरवणूक सुरू करू नका, असे आवाहन केले. अर्धा तासाने भाऊ आल्यानंतर मिरवणूक सुरू झाली.
..अन् बिरदेव ढसाढसा रडला..!
मिरवणूक यमगेच्या प्रवेशद्वारात आली. याठिकाणी अबाल वृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. स्वागतासाठी इतकी प्रचंड गर्दी पाहून बिरदेवला गहिवरून आले आणि तो गावात प्रवेश करताना ढसाढसा रडला.
कंबरेला ढोल बांधत बिरदेवने ढोल वाजवला
बिरोबा मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर देवदर्शन घेतल्यानंतर स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात ढोल वादक उपस्थित होते, त्यांच्यामध्ये जात बिरदेवने बिरोबाच्या नावांनं चांगभलं म्हणत ढोल कंबरेला बांधला आणि ढोल वाजवला.