बँक खात्यांचा गैरवापर; तपासासाठी युपी पोलिस कोल्हापुरात, फसवणूक झालेल्या तरुणाचा जबाब नोंदवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:22 IST2025-05-02T15:22:05+5:302025-05-02T15:22:39+5:30
कोल्हापूर : तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे काढलेल्या बँक खात्यांचा ऑनलाइन फसवणुकीसाठी वापर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चार महिन्यांपूर्वी ...

बँक खात्यांचा गैरवापर; तपासासाठी युपी पोलिस कोल्हापुरात, फसवणूक झालेल्या तरुणाचा जबाब नोंदवला
कोल्हापूर : तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे काढलेल्या बँक खात्यांचा ऑनलाइन फसवणुकीसाठी वापर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चार महिन्यांपूर्वी उघडकीस आणला होता. याबाबत उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात फिर्याद दाखल झाली आहे. तपासासाठी कानपूर पोलिस बुधवारी (दि. ३०) कोल्हापुरात पोहोचले. फसवणूक झालेल्या तरुणाचा जबाब नोंदवला असून, बँक खाते काढण्यासाठी त्याला पैशांचे आमिष दाखवणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असल्याचे कानपूर पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही बेरोजगार तरुणांना ५ ते २५ हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे विविध बँकांमध्ये खाती काढली होती. संबंधित खात्यांना सायबर चोरट्यांनी त्यांचे स्वत:चे मोबाइल नंबर जोडल्याने मूळ खातेदारांना त्यावरील व्यवहारांची काहीच कल्पना आली नाही. सायबर चोरट्यांनी या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला आहे. जुलै २०२३ ते जून २०२४ या काळात कोल्हापूरसह सीमाभागातील अनेक तरुणांच्या खात्यांवरून लाखो रुपयांचे व्यवहार झाले.
या सर्व रकमा सायबर चोरट्यांनी काढून घेतल्या आहेत. याबाबत उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या पोलिसांनी काही बँक खातेदारांना नोटिसा पाठवल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. पाच-दहा हजारांच्या आमिषाने तुरुंगात जाण्याची वेळ आल्याने संबंधित खातेदारांचे धाबे दणाणले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन कानपूर येथील सिसामाऊ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राणू रमेश चंद्र आणि संकल्प पांडे यांचे पथक बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून त्यांनी संशयित खातेदारांचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका तरुणाला शोधून त्याचा जबाब नोंदवला.
एजंट पळाले
बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावे बँक खाती काढणारे एजंट कारवाईच्या भीतीने पळाले आहेत. कदमवाडीतील एका एजंटने शहरातील ३५ ते ४० जणांच्या नावे खाती काढली आहेत. कागल आणि निपाणी येथील दोघांचाही या रॅकेटमध्ये समावेश असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.
देशभर व्याप्ती
कानपूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन लाखांची रक्कम कोल्हापुरातील तरुणाच्या खात्यावर वर्ग झाली आहे. त्याच गुन्ह्यातील पैसे महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील विविध शहरांमधील बँक खात्यांमध्ये जमा झाल्याची माहिती कानपूर पोलिसांनी दिली. याची व्याप्ती मोठी असल्याने देशभर तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.