कोल्हापूर : शहरातील विविध ठिकाणची अवैध व अनधिकृत ८७६ जाहिरात फलक, स्टॅण्ड बोर्ड व बॅनर्स महापालिकेने काढून ती जप्त केली. तसेच दोन नागरिकांवर जुना राजवाडा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची मोहीम शहरातील चारही विभागीय कार्यालये तसेच अतिक्रमण निर्मूलन विभाग, इस्टेट विभागाच्या वतीने राबविण्यात आली. यामध्ये ३७१ डिजिटल फलक, ४७४ बॅनर्स व झेंडे, ३० स्टॅण्ड बोर्ड व एक कमान बोर्ड अशी अतिक्रमणे हटवून जप्त करण्यात आली.
नागरिकांनी महानगरपालिका जागेवर अगर खासगी जागेत जाहिरात फलक लावण्याचे असल्यास रीतसर परवाना घ्यावा. जाहिरात फलक विनापरवाना लावल्यास सदर फलक अनधिकृत ठरवून कारवाई करून मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.