Kolhapur: दुचाकी चोरली, घरफोडी केली; सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅच झाला.. अन् चोरटा सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:21 IST2025-12-09T18:20:01+5:302025-12-09T18:21:28+5:30
दोन दिवसांची पोलिस कोठडी

Kolhapur: दुचाकी चोरली, घरफोडी केली; सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅच झाला.. अन् चोरटा सापडला
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बांदिवडेतील दुचाकी आणि निकम वाडीतील घरफोडी करून साडेतील लाखांची चोरी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला मुद्देमालासह पन्हाळा पोलिसांनी हुक्केरीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले. आनंद सोमाप्पा सुटकन्नावर (२८, रा. अर्जुनवाडा रोड हुक्केरी, जि. बेळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. सोमवारी (दि. ८) चोरट्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिली. सीसीटीव्ही आणि गोपनीय बातमीदाराकडून दोन घरफोडी आणि दुचाकी अशा तीन चोऱ्यांचा छडा पन्हाळा पोलिसांनी लावला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्याने शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गावातील किराणामालाच्या दुकानातील २४ हजार चोरून पुढील प्रवासासाठी गावातील दुचाकी चोरली. चावरे फाट्यावर गाडीतील तेल संपल्याने ती गाडी तेथे सोडली. चोरटा चालत बांदिवडे येथे आला. त्याने बांदिवडेतील संग्राम भोसलेची दुचाकी चोरून निकमवाडीत आला. निकमवाडीतील बाहेरगावी राहणारे नितीन माने यांच्या घराचे कुलूप मोडून सोन्यासह २२ हजार रोकड चोरली. त्याच गावातील नातेवाइकांकडे गेलेल्या मालूबाई यांच्या घराचे कुलून फोडून घरातील दीड तोळ्याचा ऐवज चोरला. चोरट्याने दोन्ही घरांतून ३ लाख ५५ हजार रुपयांची चोरी केली.
पन्हाळा पोलिस समीर मुल्ला आणि संतोष वायदंडे यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा घुंगूर ते हुक्केरीपर्यंत मार्ग ४० सीसीटीव्हीद्वारे तपासला आणि खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलिस चोरट्याच्या घरापर्यंत पोहाेचले. पन्हाळा पोलिसांनी संशयित चोरट्याला घरातून ताब्यात घेऊन कारवाई केली. पोलिसांनी चोरट्याने चोरलेल्या मुद्देमालपैकी दुचाकीसह १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित आनंद सुटकन्नावर याच्याकडून आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चोरट्याने २३ नोव्हेंबरला शाहूवाडीतील घुंगूर गावातील दुकानासह एक घरफोडी केली होती. त्याने दुकानातून २४ हजार चोरले होते तर घरात काहीच सापडले नसल्याचे पोलिस जबाबात सांगितले आहे. घुंगूरमधून बाहेर पडताना गावातील दुचाकी चोरली. त्यामुळे परराज्यातील चोरट्याने यापूर्वी शाहूवाडी तालुक्यात अजून कोठे घरफोड्या केल्या आहेत का? शिवाय घुंगूर गावातील केलेल्या दुकान, घरफोडीसह पळून जाण्यासाठी चोरलेल्या दुचाकीच्या पुढील तपासासाठी चोरट्याला शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.