Kolhapur Accident: कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात चिमुकली तीस फूट शेतात उडून पडली, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:52 IST2025-12-06T12:50:16+5:302025-12-06T12:52:55+5:30
जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले

Kolhapur Accident: कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात चिमुकली तीस फूट शेतात उडून पडली, दोघांचा मृत्यू
चुये : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी शंकर कोळी (वय ४५. रा कागल मुळ गाव नानीबाई चिखती ता. कागल) व कार चालक अतुल अरविंद पाटील (वय ३३. गुहाळ राधानगरी) यांचा मृत्यू झाला.
दुचाकीस्वार यांच्या पत्नी वैशाली शिवानी कोळी (वय ३९) आणि नात सुप्रभा चंदन दळवी (3) तर कारमधील अनिल निवासी कोळी अजुन पाटील (वय ३५ धामोड, ता. राधानगरी) हे सर्व जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल, शुक्रवारी घडली.
अधिक माहिती अशी, शिवाजी कोळी, पत्नी वैशाली व नात सुप्रभा यांना दुचाकीवरून कागलहून गारगोटी येथे कामासाठी जात होते. चुये फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांना समोरासमोर धडक दिली. या धडकेत शिवाजी रस्त्यावर आपटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेली पत्नी व नात उडून रस्त्याच्या बाजूला पडले. दोन्ही वाहन चक्काचूर झाले आहेत.
जखमी झालेल्या पत्नीच्या हातातील तीन वर्षांची नात या धडकेत सुमारे तीस फूट शेतात उडून पडली. शिवाजी कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
अतुल पाटील कागल येथील किर्लोस्कर कंपनीत नोकरीला होते. त्यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.