सहा महिन्यांत ‘स्वाइन’चे वीस बळी

By Admin | Updated: August 23, 2015 17:53 IST2015-08-23T17:48:15+5:302015-08-23T17:53:51+5:30

जिल्ह्यातील परिस्थिती : १७६ पैकी ८० रुग्णांची चाचणी होकारार्थी

Twenty-two-year-old swine has been killed in six months | सहा महिन्यांत ‘स्वाइन’चे वीस बळी

सहा महिन्यांत ‘स्वाइन’चे वीस बळी

कोल्हापूर : स्वाइन फ्लूची साथ हळू-हळू डोके वर काढू लागली आहे. आतापर्यंत कोल्हापुरात १७६ संशयितांना स्वाइनची लागण झाल्याचा संशय म्हणून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ८० रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर खासगी व सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत तर जानेवारी २०१५ ते २१ आॅगस्ट २०१५ अखेर २० रुग्णांचा जीव स्वाइन फ्लूने घेतला आहे.
२००९ मध्ये ‘इन्फ्ल्यूंझा एच-१, एन-१’ विषाणू हा सिझनल फ्लू म्हणून सर्वत्र पसरू लागला आहे. विशेष म्हणजे हा विषाणू प्रामुख्याने नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद अशा मोठ्या गर्दीच्या शहरात मोठ्या प्रमाणात आढळून आला तर यातील काही रुग्णांचा राज्यात संचार झाल्याने याची व्याप्ती हळू-हळू वाढू लागली. मागील वर्षी अनेक जणांचे कोल्हापुरातही या रोगाने बळी घेतले. यंदा जानेवारी २०१५ पासून या रोगाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यंदा २० रुग्णांचे आजपर्यंत बळी गेले आहेत.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआरसह गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, आजरा, पन्हाळा, कोडोली, शाहूवाडी, गांधीनगर, कागल, शिरोळ, सेवा रुग्णालय कसबा बावडा, करवीर, गगनबावडा, राधानगरी आदी ठिकाणी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत. याशिवाय शहरातही महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटल, अ‍ॅपल सरस्वती, अ‍ॅस्टर आधार, सिद्धिविनायक, मोरया, स्वस्तिक, डी. वाय. पाटील, तर इचलकरंजी येथे आय.जी.एम. रुग्णालयासह ७३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १६ ग्रामीण रुग्णालये आणि ४ उपजिल्हा रुग्णालयांत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, डोकेदुखी ही स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे क्रमप्राप्त असून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन उपचार घ्यावेत. वेळेत उपचार न घेतल्यास या छोट्याशा वाटणाऱ्या लक्षणांमुळे आपला जीवही आपण गमावू शकतो. त्यामुळे वेळेत उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

Web Title: Twenty-two-year-old swine has been killed in six months