Kolhapur: मूल होत नाही म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ; विवाहितेने पेटवून घेत जीवन संपविले, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:11 IST2026-01-10T18:08:37+5:302026-01-10T18:11:34+5:30
सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला

Kolhapur: मूल होत नाही म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ; विवाहितेने पेटवून घेत जीवन संपविले, चौघांना अटक
जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. कोमल उर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) असे तिचे नाव आहे. मात्र, कोमलने सासरच्या छळाला कंटाळूनच आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येस पती, सासू, दीर व भावजय जबाबदार असल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल प्रशांत उर्फ पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोमल आवळे हिने चिपरी येथे गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती.
दरम्यान, तुला मूल होत नाही. किशोरचे दुसरे लग्न करतो असे म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती, सासूसह चौघांना रात्री अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार करीत आहेत.