नगराध्यक्षांवर आज ‘अविश्वास’?

By Admin | Updated: July 14, 2015 19:50 IST2015-07-14T19:50:16+5:302015-07-14T19:50:16+5:30

इचलकरंजी नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांना आज दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार

Today's 'unbelief' on the head of the city? | नगराध्यक्षांवर आज ‘अविश्वास’?

नगराध्यक्षांवर आज ‘अविश्वास’?

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची पूर्वतयारी म्हणून कॉँग्रेसने त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. पालिका सभागृहात त्यांच्या विरोधात बहुमत असतानाही नगराध्यक्षांनी गुरूवार (९ जुलै) च्या सभेत ११ विषय कोणत्याही चर्चेविना मंजूर करून घेतले, अशी तक्रार मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे करण्यात आली. तर
आज, बुधवारी जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांना भेटून दोन्ही कॉँग्रेसकडून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता आहे.आपण कॉँग्रेसच्या आहोत, असे म्हणत नगराध्यक्षा बिरंजे यांचा कल शहर विकास आघाडीच्या बाजूनेच असल्याचे निदर्शनात आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस व त्यांच्यात शीतयुद्ध चालू होते. अशा पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कॉँग्रेसच्या शहर कार्यालयात झालेल्या मेळाव्यांमध्ये नगराध्यक्षांवरील अविश्वासाविषयी सुतोवाच केले आणि नगराध्यक्षा व कॉँग्रेस यांच्यातील दुराव्याला उघड स्वरूप प्राप्त झाले.गुरूवारी (९ जुलै) झालेल्या नगरपालिकेच्या सभेत आयजीएम दवाखाना पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विषय सभेच्या पत्रिकेवर असला, तरी तो ‘पुढील सभे’ ला करण्यात येईल, असा ‘शविआ’कडून निरोप आला होता; पण तो शब्द फिरविला. त्यामुळे या विषयावर मतदान घेण्याचा आग्रह कॉँग्रेसने धरला. त्यामुळे आयजीएम दवाखाना पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विषय २९ विरूद्ध १७ मतांनी फेटाळला. मग पुढे मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी सभागृहाबाहेर जाताना नगराध्यक्षा बिरंजे यांनी ‘शविआ’ चे पक्षप्रतोद अजित जाधव यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले. उपनगराध्यक्ष सभागृहात असताना त्यांना डावलून जाधव यांना मान दिल्याने मानापमानाचे नाट्य रंगले. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळात सभेतील ११ विषय नगराध्यक्षांनी मंजूर झाल्याचे घोषित केले.
सदरच्या ११ विषयांची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी त्याबरोबर गटनेते बाळासाहेब कलागते, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, आरोग्य सभापती सुजाता भोंगाळे, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. दरम्यान, अशाच आशयाचे निवेदन शहर कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्यावतीने आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावरील अविश्वासही दाखल होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

वर्ष होत असल्याने हालचाली तीव्र
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी जानेवारी महिन्यात राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले.
एक वर्षाची मुदत भरण्यापूर्वी नगराध्यक्षांवर अविश्वास आणता येत नाही, असे कायद्याचेच संरक्षण नगराध्यक्षांना असल्याने त्यावेळी बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता आला नाही.
त्यांना आता १५ जुलैला एक वर्ष पूर्ण होत असल्याने आता नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर अविश्वासाच्या हालचालींना तीव्रता आली आहे.

Web Title: Today's 'unbelief' on the head of the city?