आज मकरसंक्रांत, बाजारपेठेत तिळगुळाचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:30+5:302021-01-14T04:20:30+5:30

कोल्हापूर : तिळगुळाचा गोडवा जीवनात यावा, अशी सदिच्छा व्यक्त करणारा मकर संक्रांत हा सण आज (गुरुवारी) साजरा होत आहे. ...

Today Makar Sankranti, sesame sweet in the market | आज मकरसंक्रांत, बाजारपेठेत तिळगुळाचा गोडवा

आज मकरसंक्रांत, बाजारपेठेत तिळगुळाचा गोडवा

कोल्हापूर : तिळगुळाचा गोडवा जीवनात यावा, अशी सदिच्छा व्यक्त करणारा मकर संक्रांत हा सण आज (गुरुवारी) साजरा होत आहे. यानिमित्ताने बाजारपेठेला पांढरे तिळगूळ, तिळगुळाच्या वड्यांचा गोडवा आला आहे तर कपड्यांची दुकाने विविध प्रकारातील काळ्या वस्त्रांनी सजली आहेत.

नववर्षातल्या मकर संक्रांत या पहिल्या सणाला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. यानिमित्त बुधवारी घराघरात तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वरण-वांगं, गाजराची मिश्र भाजी, मेथीची भाजी, चटण्या, राळ्याचा भात, कांद्याची पात, गाजर असा पारंपरिक बेत करण्यात आला. हे नैवेद्य देवांना दाखवून शेजारील पाच घरांमध्ये वाटला जातो. आज (गुरुवारी) मकर संक्रातीचा मुख्य सण असून, यादिवशी सुवासिनी बुडूकलीमध्ये औसा पूजन करतात. बहुतांशी घरांमध्ये पुरणपोळीचा बेत असतो. मात्र, ज्यांना शक्य नाही अशा कुटुंबांमध्ये शेंगदाणे-तिळाची पोळी, खव्याची पोळी, गुळपोळी असेही पोळ्यांचे विविध प्रकार केले जातात. यादिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे शहरातील कपड्यांच्या दुकानांमध्ये लहान, मोठ्यांसाठीच्या वेगवेगळ्या प्रकारातील फॅशनचे कपडे, महिलांसाठीच्या साड्या, ड्रेस अशा वेशभूषा दर्शनी भागात मांडण्यात आल्या होत्या. सायंकाळी सगळेजण एकमेकांना तिळगूळ देताना ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’चा संदेश देतात. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात तिळगुळाची आवक झाली होती.

--

फोटो नं १३०१२०२१-कोल-संक्रांत०१

ओळ : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला (बुधवारी) कोल्हापुरातील बाजारपेठेत तिळगुळाची मोठी आवक झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

०२

या सणाला काळे कपडे घालण्याची पद्धत असल्याने या रंगाचे कपडे दुकानात मांडण्यात आले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Today Makar Sankranti, sesame sweet in the market