पोलिस असल्याचा बनाव, पनवेलच्या सराफाला लुटले; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:01 IST2025-10-04T14:00:52+5:302025-10-04T14:01:07+5:30
३४ लाखांचे दागिने लंपास

पोलिस असल्याचा बनाव, पनवेलच्या सराफाला लुटले; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक
आजरा (जि. कोल्हापूर) : पोलिस असल्याचा बनाव करून पनवेल येथील सराफाकडून ३४ लाख २८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या जिल्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सागर धनाजी पाटील, भिकाजी सीताराम पाटील (दोघे रा. शेळप, ता. आजरा) व सुधाकर भीमराव पाटील (रा. नरतवडे, ता. राधानगरी) यांच्याकडून दोन कारसह मुद्देमाल जप्त केला. ही घटना अटल सेतूच्यापुढे २६ सप्टेंबर रोजी घडली.
पनवेल पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विराज विजय शिरकांडे (२४, रा. करंजाडे, ता. पनवेल) हे केतन गजानन सुरवासे यांच्यासोबत झवेरी बाजार येथील सराफी दुकान बंद करून आपल्या गावी जात होते. संशयित तिघे अंगात खाकी वर्दी, डोक्यावर इन्स्पेक्टर कॅप, दोन्ही खांद्यावर एक स्टार व हातात पोलिस काठी घेऊन अटल सेतूच्या पुढे उभे होते.
त्यांनी गाडी थांबविली व अटल सेतूवर १२० स्पीडने गाडी चालविता येत नाही, असे सांगत दोघांनाही मारहाण करीत त्यांच्या गाडीतून बाहेर काढले व त्यांच्याकडील सोन्याची दोन बिस्किटे, रोख रक्कम, मोबाइल काढून घेतले. मारहाण करीत दोघांना आपल्या गाडीत बसविले व निर्मनुष्य ठिकाणी नेऊन सोडले. फिर्याद दाखल होताच पनवेल पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबविली व आरोपींना अटक केली.