कोल्हापुरात गावठी पिस्तुले विकायला आणलेल्या तिघांना अटक; सांगली, पुणे जिल्ह्यांतील दोघे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:30 IST2025-03-27T15:29:33+5:302025-03-27T15:30:37+5:30
जादा पैसे मिळवण्यासाठी पिस्तूल विक्रीचा मार्ग अवलंबला

कोल्हापुरात गावठी पिस्तुले विकायला आणलेल्या तिघांना अटक; सांगली, पुणे जिल्ह्यांतील दोघे
कोल्हापूर : दसरा चौकात गावठी पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून त्यांना पिस्तुले पुरवणाऱ्या पुरवठादारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २६) अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, एक जिवंत काडतूस, दुचाकी आणि तीन मोबाइल असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
प्रथमेश भटूपंत गायकवाड (वय २०, रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली, राम मारुती सावंत (१९, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि शुभम शंकर मासुले (२३, रा. इंदिरानगर, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. यातील प्रथमेश आणि राम हे दोघे पिस्तुलाची विक्री करण्यासाठी दसरा चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार संदीप बेंद्रे यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २५) सकाळी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील शुभम मासुळे याच्याकडून विक्रीसाठी पिस्तुले आणल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने यवत येथे जाऊन मासुळे याला अटक केली.
मासुळे याच्यावर पुणे जिल्ह्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आणखी काहीजणांना पिस्तुलांची विक्री केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिन्ही संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार पथकाने ही कारवाई केली.
गायकवाड, सावंत एमआयडीसीतील मित्र
प्रथमेश गायकवाड आणि राम सावंत हे दोघे शिरोली एमआयडीसी येथे एका कंपनीत काम करत होते. कामाच्या ठिकाणी मैत्री झाल्यानंतर त्यांनी जादा पैसे मिळवण्यासाठी पिस्तूल विक्रीचा मार्ग अवलंबला. मात्र, पहिल्याच प्रयत्नात ते दोघे पोलिसांच्या हाती लागले.