कोल्हापूर : टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक शिक्षक शुक्रवारी शाळा बंद करून रस्त्यावर उतरले. बोल मेरे भाई हल्ला बोल, अशा घोषणांनी मोर्चा परिसर दणाणून गेला. आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन शासनाला भावना कळवण्याची विनंती करण्यात आली.दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगता झाली. मोर्चा दरम्यान ओ शासको होश मे आओ, होश मे आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा अशा घोषणा शिक्षक देत होते. शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. आमचे एक दिवसाचे वेतन कोण कपात करतंय हेच आम्ही पाहणार, असा इशाराही शिक्षकांनी दिला. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, एस. डी. लाड, राहुल पवार, दादा लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, अर्जुन पाटील, भय्या माने, शरद लाड, शारंगधर देशमुख, प्रमोद तौंदकर उपस्थित होते.
मग त्यांनाही टीईटी सक्ती कराशिक्षक भरती झाले तेंव्हा तत्कालीन पात्रता पूर्ण करून सेवेत आले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देऊन शासनामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची पात्रता रद्द करून त्यांना टीईटी सक्ती करावी, अशी मागणी शिक्षक नेते दादा लाड यांनी केली.
शाळा बंदला संमिश्र प्रतिसादजिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक शिक्षक शुक्रवारी शाळा बंद करून रस्त्यावर उतरले खरे, मात्र, शाळा बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. जिल्हा परिषद व महापालिकेच्या सर्व शाळा बंद ठेवल्या असल्या तरी काही खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा सुरू असल्याचे चित्र होते. शिक्षकांनी आधीच बंदची हाक देत विद्यार्थ्यांना याची कल्पना दिली होती. त्यामुळे त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवारी सुट्टीच मिळाली.
सरकारने टीईटीसंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास आंदोलन तीव्र करू - जयंत आसगावकर (शिक्षक आमदार)
टीईटी सक्तीच्या विरोधातील आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. शिक्षक भरती झाले तेंव्हा पात्रता पूर्ण करूनच ते सेवेत आले आहेत. त्यामुळे टीईटीची सक्ती करणे चुकीचे आहे. - विजयसिंह माने, अध्यक्ष बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, पेठवडगाव,
‘टीईटी’बाबतच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो शिक्षक अडचणीत आले आहेत. शिक्षकांनी याला विरोध करीत संघर्ष पेटता ठेवला आहे. -प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था.
Web Summary : Thousands of Kolhapur teachers protested against mandatory TET, demanding policy changes and revocation of a government decision. Led by MLA Jayant Asgaonkar, they submitted their demands to the collector, highlighting the mixed response to the school closures.
Web Summary : कोल्हापुर में हजारों शिक्षकों ने टीईटी अनिवार्यता के खिलाफ प्रदर्शन किया, नीति में बदलाव और सरकारी फैसले को रद्द करने की मांग की। विधायक जयंत आसगांवकर के नेतृत्व में, उन्होंने कलेक्टर को अपनी मांगें सौंपी, स्कूल बंद को मिली-जुली प्रतिक्रिया रही।