Kolhapur: उत्तूर, चव्हाणवाडीतील तीन मंदिरात चोरी; मूर्तीच्या हातातील त्रिशूल, धातूचा कलश, पादुका केल्या लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:52 IST2025-10-31T18:51:53+5:302025-10-31T18:52:23+5:30
एकाच रस्त्यावरील ३ मंदिरे लक्ष्य...

Kolhapur: उत्तूर, चव्हाणवाडीतील तीन मंदिरात चोरी; मूर्तीच्या हातातील त्रिशूल, धातूचा कलश, पादुका केल्या लंपास
उत्तूर : चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील जोमकाई मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिर व चव्हाणवाडी तिट्ठा उत्तूर येथील रेणुकादेवी मंदिरात अज्ञाताने बुधवारी (२९) रात्री चोरी केली व १ लाख ६७ हजारांचा ऐवज लांबविला.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (२९) रात्री संबंधित देवळांचे पुजारी मंदिरे बंद करून गावात आले होते. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. मूर्तीच्या हातातील चांदीचे त्रिशूल, धातूचा कलश, चांदीच्या पादुका असा ७० हजारांचा ऐवज लंपास केला. 
चव्हाणवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरातील चांदीच्या पादुका, दानपेटीतील राेख ८ हजारासह ४८ हजाराचा ऐवज लांबविला तर चव्हाणवाडी-उत्तूर रस्त्यावरील रेणुका मंदिरात चांदीची रेणुका देवीची मूर्ती, चांदीची प्रभावळ, सोन्याचे मंगळसूत्र व दानपेटीतील २ हजार रुपये असा ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. जोमकाई देवी मंदिराचे पुजारी समर्थ सचिन गुरव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर अधिक तपास करीत आहेत.
एकाच रस्त्यावरील ३ मंदिरे लक्ष्य...
उत्तूर-चव्हाणवाडी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर रेणुकादेवी मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर व जोमकाई देवी मंदिर आहे. या एकाच रस्त्यावरील तीनही मंदिराचे कुलूप तोडून दरवाजाचे गज ओढून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.