Kolhapur: शिरगावात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली, रोख रक्कमेसह साहित्य केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:15 IST2025-12-25T16:14:37+5:302025-12-25T16:15:42+5:30
घटनास्थळी श्वानपथकाला फिरवले असता ते रस्त्यावरच घुटमळले.

Kolhapur: शिरगावात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली, रोख रक्कमेसह साहित्य केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद
शिरगाव : राधानगरी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेतील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. यात रोख रक्कम व साहित्य लंपास केले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव–आमजाई व्हरवडे मार्गावरील रियाज पंक्चर दुकान फोडून चोरट्याने टॉमी व इतर साहित्य चोरले. त्यानंतर शेजारील रसवंती गृहाचे पत्रे उचकटून एक हजार रुपये लंपास करत, लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानातील साहित्याचे नुकसान केले. तर साई बाजारमधील १८ हजार रुपयांची रोकड तसेच किरकोळ साहित्य चोरुन नेले. याशिवाय गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्याने लक्ष्य केले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत. याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिस गस्त सुरु करण्याची मागणी
वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस गस्त तातडीने सुरू करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान राधानगरी पोलिस स्टेशनचे अधिकारी संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथकाला फिरवले असता ते रस्त्यावरच घुटमळले.