सोन्याची चेन लंपास करणाऱ्या चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:44+5:302021-02-05T06:55:44+5:30
कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेऊन फुलेवाडी रिंग रोडवरील दोन व्यक्तींच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून अज्ञाताने पोबारा केल्याची घटना पंधरा ...

सोन्याची चेन लंपास करणाऱ्या चोरट्यास अटक
कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेऊन फुलेवाडी रिंग रोडवरील दोन व्यक्तींच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून अज्ञाताने पोबारा केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. या चोरीप्रकरणी करवीर पोलिसांनी अहमदनगर येथील संशयित युवकास अटक केली. नेवीन संजय माने (वय २३, रा. अमोलनगर, भिंगार माधवबाग. जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दि. २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
फुलेवाडी रिंग रोडवर एका कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आकाश पांडुरंग पाटील (वय २३, रा. राजोपाध्येनगर) या व्यावसायिकाची दोन तोळे वजनाची तर त्याचा मित्र योगेश पाटील (रा. कुर्डू, ता. करवीर) याची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला होता. ही चोरीची घटना दि.११ जानेवारी रोजी घडली होती. दोघांनीही करवीर पोलिसांत चोरीची तक्रार दिली होती. याबाबत कोल्हापूर पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत होते.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यात नेवीन माने याला अटक केली होती, चौकशीत त्याने कोल्हापुरातही अशाच पद्धतीचे चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यानुसार करवीर पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून संशयित नेवीन माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून उपनगरातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो.नि. संदीप कोळेकर यांनी व्यक्त केली.