कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षणाबाबत एकही हरकत नाही, उद्या शेवटची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:52 IST2025-10-16T16:51:42+5:302025-10-16T16:52:54+5:30
निवडणुकीसाठी प्रशासनाच्या तयारीला सुरूवात

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षणाबाबत एकही हरकत नाही, उद्या शेवटची मुदत
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचीआरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात कोणत्याही हरकत दाखल नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. १७ आक्टोंबरपर्यंत या हरकती नोंदवायच्या आहेत. आरक्षण प्रक्रिया संपल्याने आता प्रशासन प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.
साेमवारी जिल्हा परिषदेच्या ६८ गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या आरक्षणाबाबत हरकती घेण्यासाठी १७ आक्टोंबर म्हणजे उद्यापर्यंत मुदत आहे. परंतू पहिल्या दोन दिवसात एकही हरकत दाखल झालेली नाही. २७ आक्टोबरपर्यंत गणनिहाय मतदारयाद्या अंतिम करण्यात येणार असून ४ नोव्हेंबरपर्यंत गणाच्या मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीअखेर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी आदेश दिले असून त्यानुसार आता मतदानासाठीच्या यंत्रांचेही नियोजन सुरू करण्यात आले आहे.
बारा तालुक्यात प्रत्येक गावी यासाठी मतदान केंद्रे करावी लागतात. त्यामुळे प्रशासनाला मोठी यंत्रणा उभारावी लागते. त्यादृष्टिनेही प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली असून दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.