कोल्हापूर ‘झेडपी’च्या रणांगणात महायुती मोठ्या पेचात, फुटीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:14 IST2025-05-08T17:14:17+5:302025-05-08T17:14:41+5:30
तुलनेत ‘इंडिया’ आघाडी एनजिनसी

कोल्हापूर ‘झेडपी’च्या रणांगणात महायुती मोठ्या पेचात, फुटीची शक्यता
कोल्हापूर : जिल्ह्यात दहाही महायुतीचे आमदार बनल्यामुळे, त्यातही शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे दोन मंत्री अशा परिस्थितीत एकदम भक्कम असलेल्या महायुतीमध्येचजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत चंदगड आणि भुदरगड तालुक्यात महायुती विस्कटण्याची शक्यता असून, यामध्ये वरिष्ठांनी ‘आदेश’ दिला तरच काही तरी मिटू शकते असे चित्र आहे.
२०१७ साली भाजपचा पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी पक्षाने कंबर कसली होती. अशातच शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आल्यामुळे सत्तासंघर्षाला वेगळीच धार आली. या नावामुळेच मग राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या एका पठ्ठ्यानेही महाडिक यांना मतदान केले तर काहीजण चक्क गैरहजर राहिले होते आणि शिवसेनेतही फूट पडली होती. महाविकास आघाडीचे तत्कालीन नेते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना पहिल्या टप्प्यात जे करता आले नाही ते त्यांनी अडीच वर्षांनंतर सत्तांतर घडवून करून दाखवले.
आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुश्रीफ महायुतीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी जरी महायुती म्हणून एकत्रित लढणार असे सांगितले असले तरी चंदगड तालुक्यात भाजपला पाठिंबा दिलेले विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यातच लढत रंगू शकते. भुदरगडमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उद्धवसेनेत असलेले परंतु राष्ट्रवादीसोबत कार्यरत माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातही उभा दावा आहे.
कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे मुश्रीफ, भाजपचे संजयबाबा घाटगे आणि शिंदेसेनेचे संजय मंडलिक यांच्यात यशस्वी वाटणी झाली तर येथे अडचण येणार नाही. आजरा तालुक्यात मतदारसंघनिहाय वेगळे चित्र दिसू शकते किंवा विद्यमान आमदारांना जागा असेही सूत्र पुढे येऊ शकते.
करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यात महायुती एकत्र राहू शकेल असे दिसते. परंतु, सत्तारूढांकडेेच इच्छुकांचा अधिक ओढा असल्याने अडचणी अधिक आहेत. गडहिंग्लजमध्ये विधानसभानिहाय चित्र बदलू शकते. पन्हाळा, शाहूवाडीत जनसुराज्य विरुद्ध उद्धवसेना असेच लढतीचे चित्र राहणार आहे.
मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबल
- काँग्रेस - १४
- भाजप - १४
- राष्ट्रवादी - ११
- शिवसेना - १०
- जनसुराज्य - ०६
- ताराराणी पक्ष आघाडी (महाडिक) - ०३
- स्वाभिमानी शेतकरी संघटना - ०२
- शाहू आघाडी राधानगरी (आबिटकर) - ०२
- युवक क्रांती आघाडी (कुपेकर) - ०२
- कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी (आवाडे) - ०२
- अपक्ष - ०१
- एकूण - ६७
तुलनेत ‘इंडिया’ आघाडी एनजिनसी
महायुतीच्या तुलनेत ‘इंडिया आघाडी’ एकजिनसीपणाने या निवडणुकांना सामोरे जाऊ शकते. कारण सध्या आमदार सतेज पाटील हे या आघाडीचे एकमेव मोठे आणि जिल्हाभर सक्रिय नेते आहेत. ते आघाडीतील इच्छुकांचे समाधान करून एकत्रित आणू शकतात. त्यामुळे महायुतीच्या तुलनेत इंडिया आघाडीस धुसफूस कमी असेल असे दिसते.