Kolhapur: अर्धवट भिंतीवरून घरात प्रवेश करून पावणेतीन लाखांची चोरी, चोवीस तासांत 'स्टेला'ने उघडकीस आणली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:44 IST2025-08-29T18:43:15+5:302025-08-29T18:44:31+5:30
हातकणंगले : नरंदे, ता. हातकणंगले येथे बुधवारी संजय कांबळे यांच्या घराच्या अर्धवट भिंतीवरून घरात प्रवेश करून २ लाख ८२ ...

Kolhapur: अर्धवट भिंतीवरून घरात प्रवेश करून पावणेतीन लाखांची चोरी, चोवीस तासांत 'स्टेला'ने उघडकीस आणली
हातकणंगले : नरंदे, ता. हातकणंगले येथे बुधवारी संजय कांबळे यांच्या घराच्या अर्धवट भिंतीवरून घरात प्रवेश करून २ लाख ८२ हजारांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली हाेती. याप्रकरणी चोवीस तासांत भागोजी वसंत कांबळे (वय ३९, रा. नरंदे, ता. हातकणंगले) या चोरट्याच्या ‘स्टेला’ श्वानाच्या साहाय्याने मुसक्या आवळण्यात आल्या. या चोरीचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नरंदे येथील संजय कांबळे पत्नीसह बुधवारी दुपारी चार वाजता शेतामधील गोठ्याकडे जनावरांची धार काढण्यासाठी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजावरील अर्धवट भिंतीवरून घरात प्रवेश केला. तिजोरीचा दरवाजा उघडून लॉकरमधून सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसूत्र व रोख रक्कम असा २ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास केला हाेता.
हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांनी तत्काळ जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधून श्वानपथकास पाचारण केले. रात्री डॉग युनिटच्या हँडलरनी स्टेला नावाच्या श्वानाला दागिने ठेवलेल्या स्टीलच्या डब्याचा वास दिला. स्टेलाने आरोपी भागोजी वसंत कांबळेने झाडाखाली टाकलेले सोन्याचे दागिने शोधून काढले. भागोजी कांबळे याच्या अंगावर भुंकत जाऊन हँडलरना सूचना दिली. हातकणंगले पोलिसांनी आरोपी कांबळे याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, उपनिरीक्षक विनोद पिलाने, पोलिस अंमलदार समीर मुल्ला, अमित कांबळे, अमित भोरे, विकी भंडारे, विक्रम पाटील, अबीद गडकरी, स्टेला डॉग, युनिटचे हँडलर पृथ्वीराज निंबाळकर व राजकुमार नाईक यांना यश आले.