लगोरीने कारची काच फोडली, लाखाची रोकड लंपास केली; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:16 IST2025-10-14T15:15:53+5:302025-10-14T15:16:13+5:30
चोरट्यांचा शोध सुरू

लगोरीने कारची काच फोडली, लाखाची रोकड लंपास केली; कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर येथे एका सराफ दुकानाबाहेर लावलेल्या कारची लगोरीने दगड मारून काच फोडून दोघांनी एक लाखाची रोकड असलेली सॅक लंपास केली. हा प्रकार शनिवारी (दि. ११) सायंकाळच्या दरम्यान घडला. याबाबत गौरव सुनील चांडोले (वय ३१, सध्या रा. जिवबानाना जाधव पार्क, कोल्हापूर, मूळ रा. सांगोला, जि. सोलापूर) यांनी रविवारी (दि. १२) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांडोले हे खरेदीसाठी व्हीनस कॉर्नर येथील एका सराफ शोरूमध्ये गेले होते. तासाभराने परत आल्यानंतर त्यांना कारच्या खिडकीची काच फुटलेली दिसली. चोरट्यांनी काच फोडून रोकड असलेली सॅक लंपास केल्याचे लक्षात आले. सॅकमध्ये एक लाखाची रोकड, इअर पॉड, दोन चार्जर असा सुमारे एक लाख १६ हजारांचा मुद्देमाल होता.
याबाबत त्यांनी फिर्याद देताच शाहूपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. यात दोन चोरट्यांनी लगोरीने दगड मारून कारची काच फोडल्याचे दिसले. चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.