बाटलीत आत्मा बंद केलाय, दोन दिवसात काम मार्गी लागेल, कोल्हापुरातील शिरोलीत स्मशानभूमीत अघोरी पूजा-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:36 IST2025-10-31T12:35:49+5:302025-10-31T12:36:06+5:30
व्हिडिओ व्हायरल, गावात भीतीचे वातावरण

बाटलीत आत्मा बंद केलाय, दोन दिवसात काम मार्गी लागेल, कोल्हापुरातील शिरोलीत स्मशानभूमीत अघोरी पूजा-video
शिरोली : शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री काही मांत्रिक आणि तांत्रिक यांनी अघोरी अशी पूजा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पूजेमध्ये बाटलीत आत्मा बंद केल्याचा दावा करण्यात आला असून, “दोन दिवसांत त्याचे रिझल्ट मिळतील” असे मांत्रिक बोलतो. अघोरी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री काही अनोळखी लोकांनी स्मशानभूमीत तंबू ठोकून तंत्र–मंत्र सुरू केले. त्यांनी हातात लिंबू घेऊन मंत्रोच्चार केले, तीन ठिकाणी बसून जप केला आणि काही नावे घेत अघोरी पूजा केली. या दरम्यान बाटलीत काहीतरी टाकून आत्मा बंद केल्याचे दृश्यही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे आणि पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारी सुरू केली आहे. स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा तांत्रिक कृत्य करणे बेकायदेशीर आहे.
गावात सध्या चर्चेला उधाण आले असून, “आत्मा बंद करण्यासारखी कृती खरंच शक्य आहे का”, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. काही जण या घटनेला अंधश्रद्धा म्हणत आहेत, तर काहींचा विश्वास आहे की यामागे काहीतरी गूढ शक्तींचा खेळ आहे.
शिरोली स्मशानभूमीत काही तांत्रिक आणि मांत्रिकांनी जे अघोरी कृत्य केले आहे, याचा व्हिडिओ पोलिसांना देऊन ज्यांनी कोणी असे कृत्य केले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीवतीने करणार आहे. - पद्मजा करपे -सरपंच
शिरोली गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार मांत्रिक करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संत समाज सुधारकांची व राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये असे प्रकार घडणे ही शोकांतिका आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. -गिरीश फोंडे, माजी राज्य युवा सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती