शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:27 IST2025-10-18T14:26:15+5:302025-10-18T14:27:10+5:30
'बंटी मित्र; पण, ते ऐकत नाहीत'

शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले..
कोल्हापूर : ज्यांनी ‘गोकुळ’ची ३२ वर्षे सत्ता भोगली, त्याच काळात डिबेंचरची कपात सुरू केली. त्यांच्या सूनबाईंनी विरोधात मोर्चा काढणे किती योग्य आहे? शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’वर काढलेल्या मोर्चाने हृदयाला ठेच पोहोचल्याची खंत व्यक्त करत अशा मंडळींचा दिखाऊपणा दूध उत्पादकांनी ओळखल्याचा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हाणला. गेली साडेचार वर्षे दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला, वैयक्तिक फायद्याचे निर्णय घेतले नाहीत, कोणाचा जावई पोसला नाही, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
वसूबारसनिमित्त शुकवारी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालय आवारात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, पारदर्शक कारभारच्या बळावर उच्चांकी दूध दर व दर फरक देऊन आदर्श कारभाराचा नमुना दाखवून दिला आहे. आमदार पाटील म्हणाले, मुंबईच्या जागेसह सौर प्रकल्प असे अनेक संघ हिताचे निर्णय घेतले. ‘गोकुळ’ कोणी एकट्याच्या मालकीचा संघ नाही, दूध उत्पादकांचा केला. यामुळेच दूध उत्पादकांमध्ये आपुलकी आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, डिबेंचर संस्थांसाठी कसे योग्य आहे, हे सर्वसाधारण सभेला समजून सांगितले असते तर मोर्चा आला नसता.
डिबेंचरवरून आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे करता
डिबेंचरवर ७.८० टक्के व शेअर्स रक्कमेत वर्ग झाल्यानंतर ११ टक्के व्याज द्यावे लागते. आयुष्यभराची जोखीम कशासाठी घेता? चांगला कारभार करूनही डिबेंचरवरून आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे करणे योग्य नाही. याबाबत अभ्यास समिती नेमली असून, संस्थांची मते जाणून घेऊन बहुमताने डिबेंचर बंद करायचा, की कपात कायम ठेवायची याचा निर्णय घ्या. कोणत्याही परिस्थितीत यापुढे डिबेंचरचा विषय येता कामा नये, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मोर्चा कसा असतो हे मल्टिस्टेट वेळी दाखवून दिले
कालच्या मोर्चाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, मोर्चा कसा असतो हे मी, सतेज पाटील, चंद्रदीप नरके यांनी मल्टिस्टेटच्या मुद्द्यावेळी दाखवून दिले आहे.
संचालक मंडळाच्या सभेत तुम्ही गप्प का?
डिबेंचर तरतुदीचा विषय १५ जुलैच्या संचालक मंडळाच्या सभेत चर्चेत आला, त्यावेळी काल मोर्चाच्या नेतृत्व करणाऱ्या संचालिका उपस्थित होत्या. मग, त्यावेळी त्या गप्प का होत्या? संचालक मंडळात एक आणि बाहेर दुसरीच भूमिका घेणाऱ्यांच्या प्रोसेडिंगवरील सह्या दूध उत्पादकांना दाखवून द्या, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
बंटी मित्र; पण, ते कधी ऐकत नाहीत
‘गोकुळ’मधील सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा आल्याचे सांगत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, बंटी हे माझे मित्र असले तरी ते माझे ऐकत नाहीत. मी पटवून घेतो की नाही, हे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे साक्षीदार आहेत. शशिकांत पाटील-चुयेकर यांना पटते; पण तुम्हाला पटत नसल्याचा टोला सतेज पाटील यांना लगावला.