राजकारणाची ऐशी की तैशी; कोल्हापुरात मुश्रीफ-समरजित यांचा दोस्ताना, मुरगूडमध्ये भाजपचा उमेदवार शिंदेसेनेत, यड्रावकरांचे भाजपलाच आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:48 IST2025-11-18T12:48:19+5:302025-11-18T12:48:32+5:30
Local Body Election: गेल्या दोन दिवसांपासून अंतर्गत घडामोडींना वेग आला

राजकारणाची ऐशी की तैशी; कोल्हापुरात मुश्रीफ-समरजित यांचा दोस्ताना, मुरगूडमध्ये भाजपचा उमेदवार शिंदेसेनेत, यड्रावकरांचे भाजपलाच आव्हान
कोल्हापूर : जिल्ह्यातील तेरा नगरपालिका व नगरपंचायतींच्या अर्ज भरण्याच्या अखेर दिवशी सोयीच्या स्थानिक आघाड्या आकारास आल्याने राजकीय संदर्भ बदलले आहेत. कागल नगरपालिकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे हे कट्टर विरोधकांचा दोस्ताना झाला आहे.
मुरगूडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी भाजपच्या सुहासिनीदेवी पाटील यांना शिंदेसेनेच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. ‘शिरोळ’ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भाजपविरोधात मोट बांधली.
राज्याच्या राजकारणात गेली साडेतीन वर्षे महायुती म्हणून कार्यरत असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेनेमध्ये नगरपालिका निवडणुकीत उभी फूट पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. संवेदनशील असलेल्या कागल नगरपालिकेत गेल्या आठ-दहा दिवसांपासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. मंत्री मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्यात सरळ सामना होईल, असे वाटत असताना गेल्या दोन दिवसांपासून अंतर्गत घडामोडींना वेग आला आणि दोन्ही गट एकत्र आणि कागलकरांसह सगळ्यांनाच धक्का बसला.
भाजपचे माजी आमदार संजय घाटगे हे संजय मंडलिक यांच्यासोबत जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुरगूड नगरपालिकेत संजय मंडलिक यांनी भाजपशी हातमिळवणी करत भाजपचे प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनीदेवी यांना ‘धनुष्यबाण’ चिन्हावर नगराध्यक्षपदावर उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला.
‘कुरुंदवाड’, ‘शिरोळ’, ‘जयसिंगपूर’ नगरपालिकेत सर्वपक्षीय शाहू आघाडीने भाजपला आव्हान दिले आहे.
‘वडगाव’मध्ये ‘ताराराणी-जनसुराज्य’ विरोधात यादव पॅनेल
पेठ वडगाव नगरपालिकेमध्ये युवक क्रांती विरोधात यादव पॅनेल अशीच लढत झाली होती. मात्र, यावेळेला आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष व महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी पक्षाच्यावतीने प्रविता सालपे या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. त्यांना विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखालील यादव पॅनेलने आव्हान दिले आहे.
‘मलकापूर’मध्ये कोरे-सरूडकर यांच्यातच झुंज
मलकापूर नगरपालिकेत आमदार विनय कोरे व माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर या पारंपरिक प्रतिस्पर्धेमध्ये झुंज होत आहे.
‘चंदगड’, ‘गडहिंग्लज’मध्ये शत्रूचा झाला मित्र
चंदगडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेसनेही त्यांना हात दिला आहे. तर, गडहिंग्लजमध्ये भाजपने जनता दलाशी हातमिळवणी केली, त्यांना शिंदेसेनेनेही साथ दिल्याचे चित्र आहे.
हातकणंगलेत महायुतीबरोबर आघाडीही फुटली
हातकणंगलेत महायुती व महाविकास आघाडी फुटली असून, नगराध्यक्षपदाचा तिढा सुटत नसल्याने सर्वच पक्ष स्वबळ अजमावणार आहेत. येथे अटीतटीची लढत आहावयास मिळणार आहे.
पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला राष्ट्रवादीचे आव्हान
आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य, भाजप, शिवशाहू आघाडी, शाहू आघाडी यांना एकत्र आणत आघाडी केली आहे. तिथे अपक्षांना एकत्र करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.