Kolhapur: विदर्भ, मराठवाड्यातील पुरामुळे अंबाबाईची भाविक संख्या घटली, गतवर्षीपेक्षा ५ लाखांनी कमी झाली संख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:36 IST2025-10-01T18:36:03+5:302025-10-01T18:36:54+5:30
दिवस वाढले तरी भाविक घटले

Kolhapur: विदर्भ, मराठवाड्यातील पुरामुळे अंबाबाईची भाविक संख्या घटली, गतवर्षीपेक्षा ५ लाखांनी कमी झाली संख्या
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात सातत्याने पडणारा पाऊस आणि विदर्भ मराठवाडा, सोलापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये आलेला पूर, नागरिकांचे झालेले मोठे नुकसान आणि पुरामुळे बंद झालेले रस्ते या अस्मानी संकटामुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत घटली. घटस्थापनेपासून गेल्या नऊ दिवसांत १५ लाख ९४ हजार ४९० भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. गतवर्षीपेक्षा तब्बल ५ लाखांनी ही संख्या घटली आहे.
देशातील ५१ शक्तिपीठ व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात. यंदा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने ही गर्दी वाढण्याची अपेक्षा होती.
वाचा : रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अपूर्व उत्साह अन् अखंड जयघोषात अंबामातेची नगरप्रदक्षिणा-video
पण, नाशिक, धाराशिव, जळगाव, बीड, नांदेड, सोलापूर अशा विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कधी नव्हे ते दुष्काळी भागात पूर आला. घरांसह शेतीचे नुकसान झाले. अनपेक्षित आलेल्या या अस्मानी संकटामुळे या भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. मुंंबई, पुण्यातील भाविकदेखील कमी होते. शुक्रवार आणि शनिवार या दोन महत्त्वाच्या दिवशी धो-धो पाऊस पडल्याचाही परिणाम झाला.
वाचा : खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा
दिवस वाढले तरी भाविक घटले
देवस्थानकडील नोंदीनुसार, गेल्या पाच-सहा वर्षांत कोरोना काळातील २ वर्षे सोडली तर दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबाबाई दर्शनासाठी २० ते २२ लाख भाविक येतात. पण, यंदा ही संख्या १६ लाखांवर थांबली आहे. सरासरी ४ ते ५ लाख भाविक यंदा आलेले नाहीत. यंदा तर नवरात्रोत्सव व दसरा मिळून ११ दिवस हा सण साजरा होत आहे. दिवस वाढल्याने भाविक वाढण्याऐवजी कमी झाले. खंडेनवमी व दसऱ्याला लाखात नोंद व्हावी एवढी गर्दी नसते.
दिवस व भाविक संख्या अशी
२२ सप्टेंबर : १ लाख १८ हजार ४१७
२३ सप्टेंबर : १ लाख ७८ हजार २०७
२४ सप्टेंबर : १ लाख २५ हजार २०६
२५ सप्टेंबर : २ लाख १७ हजार २०८
२६ सप्टेंबर : २ लाख २३ हजार १०६
२७ सप्टेंबर : १ लाख १६ हजार १०७
२८ सप्टेंबर : २ लाख ४५ हजार ७२९
२९ सप्टेंबर : १ लाख ७८ हजार २०६
३० सप्टेंबर : १ लाख ९२ हजार ३०४
एकूण : १५ लाख ९४ हजार ४९०