कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:20 IST2025-07-08T18:05:53+5:302025-07-08T18:20:53+5:30
राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील बाजार समितीचे सभापती

कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ५२व्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत रघुनाथ पाटील (बाचणी, ता. कागल) यांची, तर ३३व्या उपसभापतीपदी राजाराम तुकाराम चव्हाण (येळवण जुगाई, ता. शाहूवाडी) यांची बिनविरोध निवड झाली.
कोल्हापूर शहरच्या उपनिबंधक प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सभापती पाटील यांचे नाव ॲड. प्रकाश देसाई यांनी सुचवले, तर संदीप वरंडेकर यांनी अनुमोदन दिले. उपसभापती चव्हाण यांचे नाव सुयाेग वाडकर यांनी सुचवले. त्यास सोनाली पाटील यांनी अनुमाेदन दिले.
सभापती पाटील म्हणाले, अशासकीय काळात तीन वर्षे आणि त्यानंतर गेली दोन वर्षे बाजार समितीत कार्यरत असल्याने येथील उत्पन्न वाढीचे स्रोत माहिती आहेत. आगामी वर्षभरात समितीचे उत्पन्न २५ कोटीपर्यंत नेत राज्यातील स्टार बाजार समित्यांच्या वर्गवारीत कोल्हापूर समिती निश्चित जाईल.
यावेळी संचालक ॲड. प्रकाश देसाई, भारत पाटील-भुयेकर, सुयोग वाडकर, बाळासाहेब पाटील, शेखर देसाई, शिवाजीराव पाटील, नंदकुमार वळंजु, कुमार आहुजा यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव तानाजी दळवी यांनी आभार मानले.
शाहू सांस्कृतिक वर्षभरात सुरू करणार
शाहू सांस्कृतिक सभागृह ‘बीओटी’वर देण्याचा निर्णय घेतला असून, वर्षभरात त्यातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यातून वर्षाला किमान ६० लाख रुपये कसे उत्पन्न मिळेल, याचे नियोजन केल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.
धान्याचा सेस मुरतोय कोठे?
धान्य विभागातील एकूण उलाढाल आणि त्यातून मिळणारा सेस यामध्ये तफावत असून, तेथील सेस कोठे मुरतोय? हे समजले असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.
सभापतींची ‘वऱ्हाडी टोपी’
उपसभापतीसह सर्व संचालकांना फेटे बांधले. पण, सभापती सूर्यकांत पाटील यांनी फेट्याऐवजी ‘वऱ्हाडी टोपी’ घातली होती. याबाबत त्यांना विचारले असता, बाचणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा केल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय संस्थांचे अध्यक्ष कागलात
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, ‘गोकुळ’चे अध्यक्षपद नवीद मुश्रीफ, तर कोल्हापूर बाजार समितीचे सभापतीपद सूर्यकांत पाटील यांच्या रुपाने कागल तालुक्यातच गेले. जिल्ह्यातील प्रमुख संस्थांचे अध्यक्षपद कागलातच राहिल्याची चर्चा निवड स्थळी होती.