Kolhapur: इचलकरंजीत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला काळे फासले, पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 14:27 IST2023-10-30T13:56:34+5:302023-10-30T14:27:55+5:30
अतुल आंबी इचलकरंजी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी ...

Kolhapur: इचलकरंजीत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला काळे फासले, पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट
अतुल आंबी
इचलकरंजी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने इचलकरंजीत आंदोलन सुरु होते. या आंदोलना दरम्यान, एस.टी.वर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.
यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट झाली. त्यामुळे प्रांत कार्यालय चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काळे फासण्याचा प्रकार कोल्हापूर नाका, नदीवेस नाका, प्रांत कार्यालय चौक येथे घडला.
आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार गावोगावी आता राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच १४ गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. दरम्यानच जिल्हात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
वडगावातही काळे फासले
वडगाव येथे २५ गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन पालिका चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलना दरम्यान, एस.टी.वर जाहिरात केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.
नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन
आरक्षणाबाबत सरकार गांभीर्य आहे. २ मार्गाने आपण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यात जुन्या कुणबी नोंदी आणि रद्द झालेल्या मूळ आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलीय. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतंय. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, मराठा समाजासाठी त्यांनी जो लढा उभारला आहे तो सरकारने गांभीर्याने घेतला आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे.