Kolhapur- मडिलगे खून प्रकरण: आई कुणा म्हणू मी..; आई गेली देवाघरी, बापाची जेलवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:36 IST2025-05-20T13:36:26+5:302025-05-20T13:36:41+5:30
शीतल मोरे, समीर देशपांडे कोल्हापूर : आजरा तालुक्यातील मडिलगे गावातील सुशांत आणि पूजा गुरव या दाम्पत्याच्या पोटी दीड वर्षापूर्वी ...

Kolhapur- मडिलगे खून प्रकरण: आई कुणा म्हणू मी..; आई गेली देवाघरी, बापाची जेलवारी
शीतल मोरे, समीर देशपांडे
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील मडिलगे गावातील सुशांत आणि पूजा गुरव या दाम्पत्याच्या पोटी दीड वर्षापूर्वी ही दोन्ही जुळी बाळं जन्माला आली. सुशांत कीर्तनकार, प्रवचनही करायचा. त्यामुळे त्यांनी नावंही ठेवली सोपान आणि मुक्ताई. परंतु कर्ज फेडण्यासाठी पूजाने आपले दागिने देण्यास नकार दिला आणि यातूनच सुशांतने तिचा खून केला. एका घावात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आणि ‘आई कुणा म्हणू मी’ अशी विचारण्याची दुर्दैवी वेळ सोपान, मुक्ताई यांच्यावर आली.
त्या दोन कोवळ्या जीवांना आपल्या आईला नेमकं काय झालंय हे कळलंही नाही. पत्नीचा खून करून दोन्ही बाळांना घेऊन दरोड्याचा बनाव करणाऱ्या सुशातचं काळीज कसं द्रवलं नाही. पहाटे ही घटना घडल्यापासून घरातच असलेल्या या दोन्ही पाखरांना रात्री सुशांतची आत्या चंदगड तालुक्यातील पुंद्रा गावी घेऊन गेली. आज मंगळवारी तिसऱ्या दिवसासाठी या दोघांना मडिलगे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न मोठा आहे. आई देवाघरी आणि बापाला जेलची वारी. अशात या दाेन चिमुकल्यांचा सांभाळ करायचा कोणी आणि कसा.
..अन् पतीनेच केला पत्नीचा खून, मडिलगेतील दरोड्याच्या बनावाचे कसं फुटलं बिंग.. वाचा
आयटीआय झालेला सुशांत कोल्हापुरात नोकरीला होता. ती नोकरी सोडली. संताजी घोरपडे कारखान्यात नोकरीला लावण्यात आले. तीही नोकरी सोडली. मग आचाऱ्याचा व्यवसाय सुरू केला. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील पूजाशी त्याचा विवाह झाला. आई कॅन्सरने आजारी. तीदेखील सध्या त्याच्यासोबत नव्हती.
वाचा - महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्न
कर्जबाजारी झालेल्या सुशांतने शांत डोक्याने पत्नीचा खून केला आणि या दोन चिमुकल्यांना आईच्या मायेपासून पारखं केलं. गावात सुशांतची बहीण आहे. अतिग्रे येथे सासुरवाडी आहे. पुंद्राला वडिलांची बहीण आहे. पण आयुष्यभरासाठी या दोन बाळांची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न आता गुरव यांच्या भावकीला पडला आहे.
चिमुकल्यांना आधार आत्याचाच..!
सुशांतची एकुलती बहीण कोमल गावातच असते. तिच्या कुटुंबाची परिस्थितीही बेताचीच आहे; परंतु या घटनेमुळे वयोवृद्ध, आजारी आईसह दीड वर्षाच्या भाच्यांना तिचाच आधार उरला आहे.