बांधावर कृषीमंत्री दिसले नाहीत, सत्तेच्या वाटणीत महायुतीला रस; काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:55 IST2025-05-29T18:54:08+5:302025-05-29T18:55:15+5:30

झोपलेल्या सरकारला विरोधी आघाडीने जागे केले

The grand alliance government is more interested in sharing power among local bodies than in the losses of farmers Congress leader Satej Patil criticizes | बांधावर कृषीमंत्री दिसले नाहीत, सत्तेच्या वाटणीत महायुतीला रस; काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका 

बांधावर कृषीमंत्री दिसले नाहीत, सत्तेच्या वाटणीत महायुतीला रस; काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका 

कोल्हापूर : मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री व इतर कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला नाही. महायुतीच्या सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या वाटणीत अधिक रस आहे, अशी टीका कँाग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली. विरोधी पक्ष म्हणून आम्ही झोपलेल्या सरकारला जागे करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले, राज्यात पावसाचा आठ दिवस अलर्ट होता. यावेळी सुरू असलेल्या कृषी सहायकांचा संपाकडे सरकारने दुर्लक्ष केले. डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य केल्या.

अवकाळी पावसामुळे सर्व उन्हाळी पीक वाहून गेली आहेत. त्याचे तातडीने पंचनामे करून मदत मिळाली पाहिजे. पावसामुळे मुंबईतील मेट्रो तीनची काय अवस्था झाली हे जगाने पाहिले आहे. काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे योग्य नाही. वीस वर्षांचा माझा अनुभव आहे, आम्ही कधी फोन केला, तर राहुल गांधी यांची वेळ मिळाली नाही, असे झाले नाही.

जागतिक बँकेच्या प्रकल्पातून पूर कमी होणे अवघड

आमदार पाटील म्हणाले, जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीतून पूर नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांचा आराखडा तयार केला आहे. यातून पूर कमी होणे अवघड आहे. पुराचे पाणी उपसून विदर्भाला देणेही अशक्य आहे. अलमट्टी धरण उंचीप्रश्नी बैठक झाली. त्याला विरोधातल्या एकाही आमदाराला बोलावले नाही. त्यामुळे आम्ही आज, गुरुवारी सकाळी महाविकास आघाडीचे आमदार सरकारला म्हणणे देणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांची अस्मिता

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व सीबीएससी अभ्यासक्रमांमधून कमी करणे हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमांमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली पाहिजे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तारखेच्या वादात न पडता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The grand alliance government is more interested in sharing power among local bodies than in the losses of farmers Congress leader Satej Patil criticizes