Kolhapur: दुचाकी घासली, कारवाल्याने थेट रिव्हॉल्व्हरच रोखले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:22 IST2025-08-14T18:22:16+5:302025-08-14T18:22:30+5:30
कोल्हापूर : वेळ बुधवारी रात्री नऊची. शहरातील फोर्ड कॉर्नर. निमित्त होते दुचाकी चारचाकीला घासल्याचे. वादावादी सुरू होते. थेट चारचाकीवाला ...

Kolhapur: दुचाकी घासली, कारवाल्याने थेट रिव्हॉल्व्हरच रोखले...
कोल्हापूर : वेळ बुधवारी रात्री नऊची. शहरातील फोर्ड कॉर्नर. निमित्त होते दुचाकी चारचाकीला घासल्याचे. वादावादी सुरू होते. थेट चारचाकीवाला खाली उतरून दुचाकीस्वारावर रिव्हॉल्व्हर रोखतो. बघ्याची गर्दी हाेऊ लागते. सिग्नल सुरू होते. सर्वजण निघून जातात. कोणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मीपुरीतील पोलिस ठाण्याला याचा सुगावाही लागत नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चारचाकीवाला लक्ष्मापुरीतून व्हिनस कॉर्नरकडे जात असताना वाटेतील फोर्ड कॉर्नरला सिग्नल पडल्याने थांबतो. तेथे नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी होते. गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या दुचाकी चारचाकीला घासते. यातून दुचाकी आणि चारचाकीवाल्यांमध्ये जोरदार वादावाद सुरू होतो. एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळीपर्यंत प्रकरण पोहोचते.
तेवढ्यात चारचाकीवाला खाली उतरून आपल्याकडील रिव्हॉल्व्हर त्या दुचाकीवाल्याच्या दिशेने रोखून धरतो. दुचाकीस्वार भीतीने गारद होतो. दुचाकीस्वार घाबरून थरथरायला लागतो. आजूबाजूच्या वाहनधारकांमध्ये बघ्यांची गर्दी वाढू लागते. तेवढ्यात सिग्लन चालू होतो. चारचाकीवालाही प्रकरण आपल्यावरच शेकायला नको म्हणून निघून जातो. दुचाकीवालाही मार्गस्थ होतो. याची तक्रार रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.