Kolhapur: वितरण व्यवस्थाच कुचकामी मग ‘थेट पाइपलाइन’ला बदनाम का करता..?; सतेज पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:48 IST2025-10-18T15:48:12+5:302025-10-18T15:48:12+5:30
‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारयादीत १२ हजार बोगस नावे

Kolhapur: वितरण व्यवस्थाच कुचकामी मग ‘थेट पाइपलाइन’ला बदनाम का करता..?; सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर : थेट पाइपलाइन योजनेचे पाणी पुईखडीपर्यंत आणण्याची जबाबदारी माझी होती. तेथून पुढे महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी द्यायचे होते. शहरातील वितरण व्यवस्थाच कुचकामी आहे मग योजनेची बदनामी का करता, असा सवाल कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
आमदार पाटील म्हणाले, राज्यात २०१४ ते २०१९ महायुतीचे सरकार होते, त्यावेळी थेट पाइपलाइन योजनेचा दीडशे कोटीचा हप्ता आला नंतर केंद्राचे पैसे आलेत. त्यावेळी योजना योग्य पद्धतीने होत नाही, हे दिसले नाही का..? सध्या या योजनेतून २४० लाख लिटर पाणी उचलले जाते. शहरात ८० टक्के पाणीपुरवठा या योजनेतूनच होतो. नुसत्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात पैसे द्यायचे नाही, हे काम महायुतीचे आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याच्या निधीला मंजूरी दिली, पैसे कोठे आहेत?
धुरळ्यांनी लोकं मरतील
राज्यात चार वर्षे महायुतीचे सरकार आहे, कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रस्त्यांची कशी धुळधाण उडाली हे आपण पाहतोय. धुरळ्याने लोक मरतील, अशी वेळ आल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूरकर कॉंग्रेसच्या मागे ठाम
कोल्हापुरातील लोकांना आपला विकास कोण करू शकतो? त्यांनी गेल्या चार वर्षातील महायुतीचा कारभार बघितल्याने कॉंग्रेसच्या मागे ठाम उभे राहतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरची वाताहात..
महायुतीच्या सरकारमुळे कोल्हापूरची वाताहात झाली आहे. एकही चांगले काम सध्या शहरात या सरकारकडून झालेले नसल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.
पालकमंत्री-क्षीरसागर यांचे कसे जुळले..?
शहरातील प्रश्नांबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे बैठका घेत आहेत. त्यांचे आणि राजेश क्षीरसागर यांचे जुळले की काय हे माहिती नाही. रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत आणि पालकमंत्री अधिकाऱ्यांना धारेवर धरत असल्याचे पाटील यांनी सांगितले.