कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे संवर्धन झाले.. मूळ स्वरूप खुलले; आजपासून मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:06 IST2025-08-13T12:05:34+5:302025-08-13T12:06:55+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना आज देणार अहवाल

कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे संवर्धन झाले.. मूळ स्वरूप खुलले; आजपासून मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू
कोल्हापूर : आर्द्रतेमुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग, यासह पूजाविधी आणि वातावरणाचा झालेला परिणाम कमी करत, केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देवीच्या मूळ मूर्तीचे रूप खुलवले. मूर्ती अगदी नव्यासारखी भासावी अशा रीतीने हे काम करण्यात आले आहे.
मंगळवारी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज बुधवारी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी १२ नंतर मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होईल. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संवर्धन प्रक्रियेची पाहणी केली.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी सोमवारी रात्री साडे आठ वाजता केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे उपअधीक्षक डॉ.विनोदकुमार, नीलेश महाजन, सुधीर वाघ आणि मनोज सोनवणे हे तज्ज्ञ काेल्हापुरात दाखल झाले. सोमवारी रात्री त्यांनी देवीच्या मूर्तीची पाहणी केली व मंगळवारी सकाळीच संवर्धनाला सुरुवात केली. दिवसभर हे संवर्धनाचे काम चालले. अंबाबाई मूर्तीवरील पांढरे ठिपके रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे पाषाणाचा मूळ नैसर्गिक रंग दिसू लागला.
आज बुधवारी सकाळी अंबाबाईच्या मूळ मूर्तीत प्राणतत्त्व देण्याचा धार्मिक विधी, अभिषेक आरतीनंतर दुपारी १२ नंतर मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली होईल, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारीही भाविकांनी पितळी उंबरा येथूनच उत्सवमूर्ती व देवी कलशाचे दर्शन घेतले.
वाघ, गदा, नागाचे वेटोळे दिसू लागले..
अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याने पाषणाचा रंग वेगवेगळा दिसत होता, पण आता स्वच्छतेमुळे आणि मूर्तीवर संवर्धनाचा लेप लावल्याने अंबाबाईच्या मागील वाघ, गदा, दागिने, डोक्यावरील नागाचे वेटोळे ही चिन्हेही दिसू लागली आहेत. भविष्यात हे पांढरे डाग दिसणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना आज देणार अहवाल
अंबाबाई मूर्तीची स्थिती कशी आहे, याबाबत पुरातत्त्व खात्याचे अधिकारी आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे सहा महिन्याला संवर्धन करावे लागते, पण अंबाबाई मूर्तीच्या बाबतीत ते वर्षाला करावे लागेल.