कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे दर्शन नाही, अन् संवर्धनही झाले नाही..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:34 IST2025-08-12T12:33:23+5:302025-08-12T12:34:41+5:30
आज होणार प्रक्रिया : पुरातत्वचे अधिकारी रात्री उशिरा कोल्हापुरात

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवरील नियोजित संवर्धन प्रक्रिया सोमवारी पुरातत्व विभागाचे अधिकारी उशीरा आल्याने होऊ शकले नाही. अधिकारी येणार म्हणून श्रीपूजकांनी सकाळीच देवीच्या मूळ मूर्तीतील प्राणतत्व काढण्याचा तत्वचालन (कलाकर्षण) विधी करून देवीची मूर्ती दर्शनासाठी बंद केली. मात्र पुरातत्वचे अधिकारी रात्रीचे आठ वाजून गेले तरी आले नव्हते त्यामुळे आज मंगळवारी संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे.
श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने केंद्रीय पुरातत्व खात्याच्या सल्ल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने वेळोवळी देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाते. यापूर्वी २०२३ मध्ये ही प्रक्रिया झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केल्यानंतर पुन्हा संवर्धन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोमवारी व आज मंगळवारी असे दोन दिवस ही प्रक्रिया चालणार होती.
त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता देवीच्या मूर्तीतील प्राणतत्व कलशात घेण्याचा विधी झाला व त्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन बंद केले गेले. केंद्रीय पुरातत्वचे अधिकारी सायंकाळी येणार असल्याने त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कळवले होते पण रात्रीचे आठ वाजून गेले तरी अधिकारी कोल्हापुरात पोहोचले नव्हते.
भाविकांना कलश, उत्सवमूर्तीचे दर्शन
श्रावण सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची चांगली गर्दी होती. पण कलाकर्षण विधी झाल्याने त्यांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता आले नाही. देवीचे प्राणतत्व असलेले कलश व देवीच्या उत्सवमूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. संवर्धनही झाले नाही, अन् दर्शनही झाले नाही.
अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी सायंकाळीच येणार होते. पण कलाकर्षण विधीसाठीचा मुहूर्त सकाळचाच होता. त्यामुळे दिवसभर मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवावे लागले. आज मंगळवारी संवर्धन प्रक्रिया केली जाईल. - शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती