Kolhapur-TET, SET Paper leak case: बिहारला गेलेल्या पोलिस पथकाला आरोपींचा चकवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:55 IST2025-12-05T12:53:55+5:302025-12-05T12:55:03+5:30
अटकेतील तिघांना पोलिस कोठडी

Kolhapur-TET, SET Paper leak case: बिहारला गेलेल्या पोलिस पथकाला आरोपींचा चकवा
कोल्हापूर : टीईटी आणि सेट परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी तपासासाठी बिहारला गेलेल्या पोलिस पथकाला आरोपींनी चकवा दिला. पोलिस पोहोचण्यापूर्वीच आरोपी रितेश कुमार, मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांनी पळ काढला. तरीही स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान बुधवारी (दि. ३) कराडमधून अटक केलेल्या तीन एजंटची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
टीईटीची प्रश्नपत्रिका पुरवणारा रितेश कुमार त्याच्या साथीदारांसह पुण्यातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. तिथून मिळालेल्या आधार कार्डवरील माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांचे पथक बिहारमध्ये पोहोचले आहे. पाटणा येथील एका शाळेच्या होस्टेलमध्ये रितेश कुमार राहत होता. मात्र, आठवड्यापूर्वीच तो तिथून निघून गेल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
त्याचे साथीदारही घरच्या पत्त्यांवर मिळालेले नाहीत. कारवाईची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला असावा. काही संशयितांचे पत्ते बोगस असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी एक-दोन दिवस त्यांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती तपास पथकाने दिली.
बंद शाळेत रितेश कुमारचा मुक्काम
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रितेश कुमार हा पाटणा येथील एका बंद शाळेच्या विद्यार्थी वसतिगृहात राहतो. ही शाळा २०२२ मध्येच बंद पडली. त्याने यापूर्वीही असे काही गैरप्रकार केल्याची चर्चा पाटण्यात आहे. मात्र, त्याच्यावर बिहार पोलिसांकडे गुन्हे दाखल नसल्याची माहिती मिळाली.
दोन दिवस पोलिस कोठडी
पोलिसांनी बुधवारी कराडमधून इंद्रजीत प्रवीण पुस्तके, आकाश बाबासो कदम आणि दीपक चंद्रकांत कांबळे (तिघे रा. कराड, जि. सातारा) यांना अटक केली होती. गुरुवारी (दि. ४) कागल येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. हे तिघे एजंट असून, त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दिली.