Kolhapur Crime: चोरी कर्नाटकात, ८६ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:42 IST2025-12-04T12:41:51+5:302025-12-04T12:42:16+5:30
किणी पथकर नाक्यावर कारवाई

Kolhapur Crime: चोरी कर्नाटकात, ८६ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात
पेठवडगाव : पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कर्नाटकातील गदग शहरातील चोरी प्रकरणातील आरोपीला तब्बल ८६ लाखांच्या दागिन्यांसह मुद्देमालासह पकडण्यात यश मिळविले. कर्नाटकपोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर वडगाव पोलिसांनी किणी टोलनाक्यावर कारवाई केली. याप्रकरणी महमंद हुसेन (रा. नागपूरवाला चाळ, अहमदाबाद) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
कर्नाटक व वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन याने बुधवारी पहाटे गदग येथील शांतीदुर्ग ज्वेलर्स दुकान फोडून चांदीचे दागिने, मौल्यवान खडे आणि इतर सोन्याचे दागिने असा ८६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सकाळी सहाच्या दरम्यान चोरी झाली. दुकानमालकाला ही घटना दहा वाजता लक्षात आली. चोरट्याने दुकानातील डीव्हीआरसुद्धा पळवून नेल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली होती.
घटनेनंतर कर्नाटक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चोरीनंतर रिक्षा करून एस.टी. स्टँडवर उतरत आपला प्रवास लपवण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाकडून मिळालेल्या माहितीवरून कर्नाटक पोलिसांनी पडताळणी करीत आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा पोलिसांशी संपर्क साधून सतर्कता वाढवली.
कोल्हापूर जिल्हा पोलिसप्रमुखांनी वडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलिस उपनिरीक्षक माधव डिघोळे, फौजदार आबा गुंडणके, राजू साळुंखे, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर यांचे पथक किणी टोलनाक्यावर सज्ज ठेवले.
दरम्यान, हुसेन कर्नाटक परिवहनच्या बसमधून कोल्हापूरमार्गे पुण्याकडे प्रवास करत असल्याची खात्री झाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन बॅगमध्ये ठेवलेले सुमारे ८६ लाखांचे चांदी, सोन्याचे दागिने, खडे, काही रोख रक्कम जप्त केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गदग येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मुरतजा काद्री यांच्या पथकाने वडगाव पोलिस ठाण्यात येऊन आरोपीस व जप्त मुद्देमाल ताब्यात घेतला.