TET paper leak case: संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेतील यंत्रणेकडेही, जुन्या शिक्षकांकडून उपद्व्याप शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:17 IST2025-11-25T16:15:17+5:302025-11-25T16:17:15+5:30
इतके पैसे बेरोजगार देतील?, अध्यापनाच्या क्षेत्राला लागला बट्टा

TET paper leak case: संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेतील यंत्रणेकडेही, जुन्या शिक्षकांकडून उपद्व्याप शक्य
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणी (महा-टीईटी) परीक्षेआधीच सोनगे (ता. कागल) येथे टीईटीचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी राज्य परीक्षा परिषदेच्या यंत्रणेतील कुणीतरी सामील असल्याशिवाय संबंधित टोळीचे इतके धाडस होणार नाही, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ज्या पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे, अशा शिक्षकांसाठीच पेपरफोडीचा उपद्व्याप सुरू असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील दोन-दोन तप ज्ञानदान करणारे शिक्षक अशा परीक्षांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे अचानक न्यायालयाने ही परीक्षा बंधनकारक केल्याने नोकरीतून बाहेर पडण्याच्या भीतीने या शिक्षकांनी पेपर फोडणाऱ्या टोळीचा आधार शोधल्याचा अंदाज आहे.
वाचा : ॲकॅडमीचालक, शिक्षकांचेच रॅकेट; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता
टीईटीत चांगले गुणांकन मिळाले की पवित्र पोर्टलमुळे कोणत्याही अर्थकारणाशिवाय नोकरी मिळत असल्याने जास्तीत जास्त पात्रताधारक उमेदवार 'टीईटी'कडे वळले आहेत. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका आदेशानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांनाही टीईटीचा फेरा चुकलेला नाही. मात्र, त्यासाठी थेट पेपर फोडण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत मजल गेल्याने या क्षेत्रातील काळाबाजार पुन्हा चर्चेत आला आहे.
वाचा : प्रयत्न कोल्हापुरात; खळबळ कराडात!, ‘महेश’च्या लाईफस्टाइलची चर्चा
इतके पैसे बेरोजगार देतील?
एका पेपरसाठी एका उमेदवाराकडून तीन-तीन लाख रुपये घेऊन हे पेपर लिक केले जाणार होते. डीएड, बीएड होऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनीही रविवारी टीईटी दिली. मुळात हे उमेदवार बेरोजगार असल्याने या टोळीला हे उमेदवार इतके पैसे देऊ शकतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे जे कार्यरत शिक्षक आहेत, त्यांच्यातीलच काही जणांनी या टोळीशी संपर्क साधल्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये शैक्षणिक गुणवत्तेला कमी नाही. मात्र, आर्थिक लोभासाठी काहीजण असे प्रकार करून कोल्हापूरला बदनाम करीत आहेत. या रॅकेटमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील झारीचा शुक्राचार्य कोणीतरी आहे. त्याशिवाय इतके मोठे धाडस होऊच शकत नाही. परीक्षा परिषदेने ते पहिल्यांदा शोधावे. -भरत रसाळे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समिती
टीईटीसारख्या परीक्षेमध्ये असे प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा रद्द करून पुनश्च एकदा या परीक्षेचे आयोजन करण्यात यावे. -राम करे, सचिव ऑल इंडिया यूथ फेडरेशन, कोल्हापूर.