Kolhapur: चैनीसाठी बनावट दागिने तारण ठेवण्याचा फंडा, अनेकांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:44 PM2024-03-07T13:44:06+5:302024-03-07T13:44:45+5:30

दिलीप चौगुले टोळीचा सूत्रधार, संगनमत करून निर्दोष लोकांच्या कागदपत्रांचा वापर 

Taking loans from banks by pledging fake gold in kolhapur | Kolhapur: चैनीसाठी बनावट दागिने तारण ठेवण्याचा फंडा, अनेकांना घातला गंडा

Kolhapur: चैनीसाठी बनावट दागिने तारण ठेवण्याचा फंडा, अनेकांना घातला गंडा

कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून बँकांमधून कर्जाची उचल करणाऱ्या टोळीचा सूत्रधार भामटा दिलीप गंगाराम चौगुले (रा. खोपडेवाडी, पो. मांडुकली, ता. गगनबावडा) आणि बँकेचा मूल्यांकनकार सोनार सागर अनिल कलघटगी (रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) हे दोघे असल्याचे तपासात समोर आले. त्यांनी संगनमत करून निर्दोष लोकांच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांना गंडा घातला. कर्जाची रक्कम त्यांनी चैनीसाठी उडविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधील बनावट सोने तारण फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला दिलीप चौगुले हा सराईत भामटा आहे. कर्ज थकल्यामुळे बँका नव्याने कर्ज देत नाहीत. पैशांची गरज असल्यामुळे माझ्याकडील दागिने तुमच्या नावावर तारण ठेवून कर्ज घ्या. कर्जाची रक्कम घेऊन वेळेवर हप्त्यांची परतफेड करतो, अशी गळ तो अनेकांना घालत होता. मुलगा आजारी आहे. बायकोचे ऑपरेशन आहे. नातेवाइकांना पैशांची गरज आहे, अशी अनेक कारणे सांगत तो बनावट दागिने तारण ठेवण्यासाठी ओळखीच्या लोकांना भाग पाडत होता.

कर्जदार मिळाल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा अधिकृत मूल्यांकनकार सागर कलघटगी याच्याकडे तो कर्जदाराला पाठवत होता. संगनमताने कर्ज मंजूर करून कर्जाची रक्कम उचलली जात होती. यातील बहुतांश रक्कम दोघांनी चैन करण्यात उडविली.

गुन्हा दाखल असूनही मूल्यांकनकार कसा?

सोनार कलघटगी याच्यावर यापूर्वी फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. तरीही बँकेने खातरजमा न करता त्याला अधिकृत मूल्यांकनकार कसे केले? कमी कालावधीत त्याच्यावर अधिकाऱ्यांनी विश्वास कसा ठेवला? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हप्ते थकवल्याने संशय बळावला

बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या बहुतांश कर्जदारांनी एक-दोन हप्ते भरून पुढील हप्ते थकवले. कर्जाच्या रकमा मर्यादित असूनही हप्ते थकल्याने तपासणीत त्यांच्यावरील संशय बळावला. त्यावरून फसवणुकीचा भंडाफोड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पतसंस्थांनाही गंडा

बनावट सोने तारण ठेवून कर्ज मंजूर करणाऱ्या टोळ्या पतसंस्थांमध्येही कार्यरत आहेत. यात पतसंस्थांमधील काही अधिकारीही सामील असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्रयस्थ यंत्रणांकडून पतसंस्थांमधील तारण सोन्याची तपासणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Taking loans from banks by pledging fake gold in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.