Kolhapur: अंबाबाई मंदिरात यंत्रणा झाली अलर्ट, डोअर मेटल डिटेक्टरचे बदलले सेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:41 IST2026-01-01T11:40:12+5:302026-01-01T11:41:11+5:30
पोलिसांकडून भाविकांची तपासणी : यंत्रणा झाली अलर्ट

Kolhapur: अंबाबाई मंदिरात यंत्रणा झाली अलर्ट, डोअर मेटल डिटेक्टरचे बदलले सेटिंग
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पिस्तूल नेण्याची घटना घडल्यानंतर यंत्रणा मात्र कधी नव्हे ती अलर्ट झाली आहे. देवस्थान समितीने कंपनीला सांगून डोअर मेटल डिटेक्टरच्या अलर्टचे सेटिंग बदलले आहे, सुरक्षा यंत्रणांची पुन्हा तपासणी केली आहे, तर जिल्हाधिकारी-पोलिस अधीक्षकांनी केलेली पाहणी आणि सूचनानंतर पोलिसांनी थोडा त्रास घेत भाविकांची तपासणी सुरू केली आहे. तर काही दिवसांसाठी का असेना मंदिराबाहेरील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटले आहे.
सोमवारी एका भाविकाने पिस्तूल घेऊन मंदिरात गेल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी परिसराची संयुक्त पाहणी करून सुरक्षेसंबंधीच्या कडक सूचना केल्या. या घटनेनंतर चारही दरवाज्यांवरचे पोलिस बुधवारी भाविकांची तपासणी करत होते. अलर्ट राहून बॅगा तपासल्या जात होत्या.
सर्किट बेंच येथे ज्या पद्धतीने डोअर मेटल डिटेक्टरचे सेटिंग आहे. म्हणजे ठराविक वजनापेक्षा जास्त वजनाचे मेटल दारातून गेले तर जास्त आवाजाचा अलर्ट दिला जातो त्या पद्धतीचे सेटिंग अंबाबाई मंदिराच्या दरवाज्यांवरील डिटेक्टरचे केले आहे. सध्या काही दिवसांसाठी का असेना बाह्य परिसरातील फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण हटले आहे.
अतिक्रमणाची नाही माहिती...
मंदिर बाह्य परिसरात किती लोकांचे अतिक्रमण आहे याची माहिती तयार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. बाह्य परिसर देवस्थानच्या अखत्यारित येत नाही. तर महापालिकेकडे येथील अतिक्रमणाची माहिती नाही.
एकच बीप कसे वाजते ?
मंगळवारच्या पाहणीत पोलीस अधीक्षकांनी डोअर मेटल डिटेक्टरची तपासणी केली. यात त्यांना मोबाईल नेले तरी एकच बीप वाजते आणि पिस्तूल नेले तरी एकच बीप वाजते हे लक्षात आले. त्यांनी देवस्थान समितीला एकच बीप कसे वाजते अशी विचारणा केली. पिस्तूलसारखी घातक गोष्ट डिटेक्टरमधून गेली असेल तर त्याचा जास्त अलर्ट बीप वाजला पाहीजे. कंपनीला कळवून त्रुटी दूर करून घ्या असे सांगितले.