Kolhapur Crime: तुमच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट; डिजिटल अरेस्टची भीती दाखविली.. ६३ लाखांची फसवणूक केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:40 IST2025-11-25T12:39:44+5:302025-11-25T12:40:36+5:30
६३ लाखांची रक्कम बॅंकांतील अज्ञाताच्या बनावट खात्यामध्ये वर्ग करण्यास भाग पाडले

Kolhapur Crime: तुमच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट; डिजिटल अरेस्टची भीती दाखविली.. ६३ लाखांची फसवणूक केली
गांधीनगर : तुमच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह मजकूर पाठविला आहे, तुमच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट आहे, असे सांगून हे वॉरंट रद्द करण्याचे आमिष दाखवून गोपाळ गजानन साळोखे (वय ६३, रा. कोयना वसाहत, गांधीनगर) यांची ६२ लाख ९५ हजार ६०६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपाळ साळोखे हे एसटी महामंडळातून मेकॅनिकल या पदावरून निवृत्त झाले आहेत. २८ ऑक्टोबर रोजी त्यांना मोबाईलवर अज्ञाताचा काॅल आला. मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशन येथून पोलिस अधिकारी बोलत असून, तुमच्या आधार कार्डवरून सिम कार्ड बनविले आहे. या सिम कार्डवरून आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याच्या तक्रारी हिमाचल प्रदेश आणि हरयाणा येथे दाखल झाल्या आहेत. तसेच साळोखे यांच्या एटीएम कार्डवरून आणि खात्यावरून मनी लाँड्रिंगचे २५ ते २६ कोटी रुपयांचे व्यवहार होऊन त्यातून २३७ एटीएम कार्ड जप्त केले आहेत.
तुमच्या अकाऊंटवरून पीएफआय या संघटनेच्या खात्यावर व्यवहार झाले आहेत; त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे, असे सांगत त्या अज्ञात व्यक्तीने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आयडी कार्डही साळाेखे यांना व्हाॅटसॲपवर पाठविले. अटकेपासून वाचविण्यासाठी फिर्यादी गोपाळ साळोखे यांच्या सर्व बँक खात्यातील तसेच पोस्टातील ठेवी अशी ६३ लाखांची रक्कम बॅंकांतील अज्ञाताच्या बनावट खात्यामध्ये वर्ग करण्यास भाग पाडले.
तपास पूर्ण झाल्यानंतर ही सर्व रक्कम आरपीआयच्या सूचनेनुसार परत देण्याचे आश्वासन अज्ञाताने दिले. ४ नोव्हेंबरपर्यंत हा सर्व प्रकार झाला असून त्यानंतर अज्ञाताचा कोणताही फोन किंवा मेसेज आला नसल्याचे लक्षात आले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे साळुंखे यांना समजल्यानंतर त्यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे करीत आहेत.