Kolhapur Crime: करणी केल्याचे सांगितले, स्वत:च्या जाळ्यात ओढले; चुटकीवाला भोंदू बाबा महिलेला घेऊन पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:08 IST2025-11-21T17:08:26+5:302025-11-21T17:08:26+5:30
पोलिसांकडून दरबाराची झडती

Kolhapur Crime: करणी केल्याचे सांगितले, स्वत:च्या जाळ्यात ओढले; चुटकीवाला भोंदू बाबा महिलेला घेऊन पळाला
कोल्हापूर : चुटकी वाजवून करणी काढणे, भूतबाधा, गृहदोष नाहीसा करण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारा चुटकीवाला भोंदू बाबा एका महिलेला घेऊन पळाला आहे. सनी रमेश भोसले (रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, टिंबर मार्केट) असे भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत संबंधित महिलेच्या पतीने बुधवारी (दि. १९) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात राहणारे फिर्यादी आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे टिंबर मार्केट येथील चुटकीवाल्या भोंदू बाबाकडे जात होते. फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत अनेकदा त्यांनी भोंदू बाबाच्या दरबारात हजेरी लावली. त्या काळात भोंदू बाबाने फिर्यादींना कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. करणी आणि भूतबाधा काढण्यासाठी ६० ते ६५ हजार रुपये खर्च करावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून ४५ हजार रुपये घेतले.
दरम्यानच्या काळात फिर्यादींच्या पत्नीशी लगट करून त्यांना स्वत:च्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मे २०२५ मध्ये तो फिर्यादींच्या पत्नीला घेऊन निघून गेला. भूतबाधा, करणी काढण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. याबाबत जुना राजवाडा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. त्यानंतर आता महिलेचे अपहरण केल्याची आणि आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाल्याने करवीर पोलिसांकडूनही त्याचा शोध सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात लपला?
चुटकीवाला भोंदू बाबा सध्या सातारा जिल्ह्यात लपल्याची चर्चा सुरू आहे. करणी, भानामतीची भीती घालून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. गुन्हा दाखल होताच अनेक तक्रारदार समोर येत आहेत. त्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून दरबाराची झडती
भोंदू बाबा सनी भोसले याच्या टिंबर मार्केट येथील दरबाराची करवीर पोलिसांनी गुरुवारी दुपारी झडती घेतली. दरबारातून काही वस्तू जप्त केल्या. त्याच्या शोधासाठी एक पथक सातारा जिल्ह्यात गेले आहे. या गुन्ह्यातील काही साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत, अशी माहिती तपास अधिकार पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांनी दिली.