थेट पाइपलाइनचा विषय सोळांकुरच्या ग्रामसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:20+5:302021-01-20T04:24:20+5:30

कोल्हापूर : थेट पाइपलाइन योजनेचे काम सोळांकुर येथे अडले असून, या कामाच्या परवानगीचा निर्णय आता २६ जानेवारीच्या ग्रामसभेत होणार ...

Subject of direct pipeline in Gram Sabha of Solankur | थेट पाइपलाइनचा विषय सोळांकुरच्या ग्रामसभेत

थेट पाइपलाइनचा विषय सोळांकुरच्या ग्रामसभेत

कोल्हापूर : थेट पाइपलाइन योजनेचे काम सोळांकुर येथे अडले असून, या कामाच्या परवानगीचा निर्णय आता २६ जानेवारीच्या ग्रामसभेत होणार आहे. तिथे काय निर्णय होणार यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी दुपारी सोळांकुर ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा तसेच योजनेच्या कामामुळे ग्रामस्थांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी ग्रामसभेपुढे हा विषय मांडण्यात येईल, असे सांगितले.

थेट पाइपलाइन योजनेतील जलवाहिनी सोळांकुरमधील गल्लीतून जाते. मूळ आराखड्यात त्याचा समावेश आहे. परंतु लोकवस्तीतून जलवाहिनी न टाकता ती बाजूच्या डोंगरातून टाकावी, अशी ग्रामस्थांची सूचना आहे. गल्लीतून जलवाहिनी टाकली तर त्यातून राहत्या घरांचे नुकसान होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटते त्यामुळे त्यांनीच महापालिकेला पर्याय दिला आहे.

प्रशासक डॉ. बलकवडे यांनी १५ डिसेंबरला सोळांकुरला भेट देऊन चर्चा केली, तेव्हा हा पर्याय ग्रामस्थांनी दिला. परंतु तो तांत्रिकदृष्ट्या सोयीचा आहे किंवा नाही याची खणीकर्म अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाईल व त्यांचा अहवाल घेतला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले होते. त्यानुसार खणीकर्म अधिकाऱ्यांचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला. थेट पाइपलाइनचा मार्ग वळविणे तांत्रिकदृष्ट्या सोयीचा नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

प्रशासक बलकवडे यांनी मंगळवारी दुपारी सोळांकुर ग्रामपंचायतीला भेट दिली. तेथील सरपंच, सदस्य यांच्याशी चर्चा केली. ग्रामस्थांनी दिलेला पर्याय अयोग्य असल्याने मूळ आराखड्याप्रमाणे कामास संमती द्यावी, अशी विनंती केली.

-धरण क्षेत्रात पाहणी-

प्रशासक बलकवडे यांनी काळम्मावाडी धरण क्षेत्रातील कामाची माहिती घेतली. या ठिकाणी इंटेकवेलसाठी खुदाई केलेल्या जागेतील पाणी उपसण्यात येत असून, कामाने चांगली गती घेतली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता हर्षजित घाटगे, प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी उपस्थित होते.

कोट -

ग्रामस्थांशी समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. कोणतेही नुकसान होणार नाही आणि झालेच तर त्याची आम्ही जबाबदारी घेऊ, असे महापालिकेच्या वतीने आश्वासन दिले आहे. ग्रामस्थ सकारात्मक आहेत. योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

कादंबरी बलकवडे,

प्रशासक

कोल्हापूर महापालिका

Web Title: Subject of direct pipeline in Gram Sabha of Solankur