Kolhapur Accident: परीक्षेला जाण्यासाठी भाड्याने घेतली कार, अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:48 IST2025-12-09T12:48:12+5:302025-12-09T12:48:28+5:30
वाढदिवसाला दुखाची मोहर

Kolhapur Accident: परीक्षेला जाण्यासाठी भाड्याने घेतली कार, अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार
हातकणंगले : कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावर मालेफाटा येथे थांबलेल्या माल वाहतूक टेंपोला भरधाव चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चारचाकी मधील दिव्या कानिफनाथ भोसले (वय २२ रा.नानज जि. सोलापूर. सध्या राजारामपूरी, कोल्हापूर ) या विदयार्थिनीचा मूत्यू झाला. तर देविका भूते ही गंभिर जखमी झाली. या अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा पर्यंत हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल करणेचे काम सूरु होते. काल, सोमवारी (दि.८) हा अपघात झाला.
अतिग्रे येथे एम.सी.ए.च्या परिक्षेसाठी दिव्या भोसले आणि देविका भूते या दोन विद्यार्थीनी भाड्याची (एम.एच १० डी. डब्यू ०७००) या चारचाकीने सकाळी ८.३० वाजता राजारामपूरी येथून निघाल्या होत्या कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावरील मालेफाटा येथे आल्या असता रस्त्याच्या कडेला थांबलेला मालवाहतूक टेंपो क्र.. (एम.एच. ०९ ई.एम. ६२९०) ला चारचाकी चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी तीन वेळा उलटली आणि रस्त्यावर फरफटत गेली.
अपघातात चालक तसेच दिव्या भोसले आणि देविका भूते गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सूरू असताना दिव्या भोसले हिचा मूत्यू झाला. तर गंभिर जखमी देविका भूते आणि चारचाकी चालकावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, चारचाकी चालकाने सकाळपासून रात्रीपर्यंत गुन्हा नोंद करु नये यासाठी दबाव आणल्याची चर्चा होती. मात्र अपघाताचा गुन्हा दाखल होई पर्यंत दिव्या भोसलेच्या नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली.
वाढदिवसाला दुखाची मोहर
दिव्या भोसले आणि देविका भूते या दोघी मैत्रिणी एकत्र राहत होत्या. सोमवारी देविकाचा वाढदिवस होता. परीक्षा संपवून दोघी वाढदिवस साजरा करण्यासाठी चारचाकीने जाणार होत्या. त्यासाठी त्यांनी भाड्याची गाडी घेतली होती. तीच गाडी त्यांचा काळ ठरली आणि वाढदिवसाच्या आनंदावर दुखाची मोहर उमटली.