Kolhapur: शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:11 IST2024-11-21T17:10:50+5:302024-11-21T17:11:32+5:30
मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ

Kolhapur: शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : करवीर तालुक्यातील केर्ले येथील कन्या कुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून जखमी झालेल्या सहावीतील विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. स्वरूप दिपकराज माने (वय १३, रा. केर्लेपैकी मानेवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली. मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मानेवाडीतून मराठी शाळा दीड किलोमीटर लांब असल्याने आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवरून गुरूवारी सकाळी शाळेत सोडून आले होते. शाळेतील परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले होती. शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर शिक्षकांना सांगून स्वरूप लघूशंकेसाठी वर्गाबाहेर गेला.
शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना अचानक नादुरूस्त असलेले लोखंडी गेट स्वरूपच्या अंगावर पडल्याने डोक्याला गंभीर जखम होवून रक्तस्त्राव झाला. बेशुध्द अवस्थेत त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.