लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारलेल्या महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या (शुक्रवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होेणार असल्याची माहिती अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंदर पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने हा पुतळा उभारण्यात आला आहे.
सकाळी १० वाजता चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. याचठिकाणी जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात येईल. यानंतर सर्वजण पोलीस मैदानावर येतील. याठिकाणी प्रारंभी जिल्हा परिषदेच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या ३९ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येईल.
यावेळी युवराज पाटील, प्रसाद खोबरे, सुभाष सातपुते, राेहिणी आबिटकर, विद्या पाटील, रसिका पाटील, मिनाज जमादार यांचा पवार यांच्या हस्ते ‘राजर्षि शाहू पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही यावेळी अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात येणार आहेत.
चौकट
मुश्रीफ यांच्याकडून सढळ निधी
हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेला सढळ हस्ते निधी देण्यास सुरूवात केली आहे. चौथ्या मजल्यासाठी १० कोटी, रूग्णवाहिकांसाठी ७ कोटी रूपये, जिल्हा परिषद सदस्यांनाही अतिरिक्त कोट्यवधींचा निधी त्यांनी गतवर्षी दिला असून, आणखी प्रत्येकी २५ लाख रूपये देण्यात येणार आहेत. यामध्ये विरोधी भाजप, जनसुराज्य, ताराराणीच्याही सदस्यांना निधी मिळणार असल्याने सदस्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.