कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:38 IST2025-10-18T11:38:30+5:302025-10-18T11:38:46+5:30
उपचार करून पुन्हा त्यांना वसतिगृहात पाठवण्यात आले

कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय..
कोल्हापूर : पोलिसांच्या छाप्यातील सहा देहविक्रेत्या महिलांनी गुरुवारी कसबा बावडा येथील शासकीय महिला वसतिगृहात धारधार वस्तूने हाताच्या नस कापून घेऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. उपचार करून पुन्हा त्यांना वसतिगृहात पाठवण्यात आले. पुन्हा त्या असे कृत्य करू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकारांना दिली.
कळंबा तर्फे ठाणे येथील फार्म हाऊसवर २० ऑगस्टला पोलिसांनी छापा टाकला होता. त्यातील सहा पीडित महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले होते. त्या जामिनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. मात्र, त्यांना जामीन झाला नव्हता. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडित सहाही महिलांनी एकत्रितपणे हाताच्या नस धारदार वस्तूने कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातून रक्त वाहू लागताच वसतिगृहातील प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना सीपीआरमध्ये तातडीने दाखल केले. उपचारानंतर त्यांना पुन्हा वसतिगृहात हलवण्यात आले.
दरम्यान, पीडितांची सुटका ही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असते. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर वसतिगृहातून त्यांना सोडण्यात येते. मात्र, पीडित महिला आपल्याला लवकर सोडण्यात यावे, असा आग्रह होत्या. ही बाब निदर्शनास आणण्यासाठी त्यांनी स्वतःहून हाताच्या नस कापून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेशी वसतिगृह प्रशासनाशी काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
पोलिसांत नोंद नाही...
एकाच वेळी सहा पीडित महिलांनी नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असतानाही या घटनेची नोंद पोलिसात झाली नाही. यासंबंधी विचारणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे कोणतेही कलम आता अस्तित्वात नाही, असे सांगण्यात आले.