Kolhapur: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने केला खून; गंगावेश येथील 'त्या' महिलेच्या खुनातील धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:54 IST2026-02-21T11:54:13+5:302026-02-21T11:54:32+5:30
आजीच्या खुनानंतर गायब झाला, मोबाइल बंद ठेवला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kolhapur: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने केला खून; गंगावेश येथील 'त्या' महिलेच्या खुनातील धक्कादायक माहिती
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : गंगावेश येथील उषा मारुती भिऊंगडे यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व जवळचे नातेवाईक असताना चुलत नातू एकटाच नसल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले. मोबाइलही बंद होता. मृत्यूच्या सकाळी येऊनही तो नंतर गायब झाल्याने संशय बळावला. आदल्या दिवशी रात्री वडील परशराम हे उषा यांची सेवा करून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने जाऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास बेडरूममध्ये संशयास्पद स्थितीत उषा यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या पतीचे निधन ३० डिसेंबर २०२५ रोजी झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या. फुलेवाडी रिंगरोड येथील परशराम भिऊंगडे यांच्या चुलत बहिणी. मूलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर त्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. पुतण्या परशराम त्यांची भेट घेऊन औषधे देत असे.
रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री तब्येत बरी नसल्याने घरी जाऊन ते औषधे देऊन आले होते. सोमवारी सकाळी कामानिमित्त शाहूवाडी तालुक्यात गेल्यावर त्यांनी उषा यांच्या मोबाइलवर कॉल केला; पण, प्रतिसाद मिळाला नाही. चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा उषा बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या.
उषा यांचा नैसर्गिक मृत्यू नसून रोज औषधे देण्यासाठी येणाऱ्या परशराम यांचा मुलगा आणि चुलत नातू प्रेम याने खून केल्याचे समोर आले. प्रेमला महाविद्यालयीन शिक्षणापासून चैनीची सवय लागली. चैनीसाठी पैसे कमी पडल्याने त्याने वडील सेवा करीत असलेल्या आणि आपल्या चुलत आजी उषा यांचा दागिने चोरण्यासाठी खून करण्याचे ठरविले.
वाचा: चैनीसाठी पैशांची गरज, चहात विषारी रसायन घालून नातवानेच केला आजीचा खून
त्याने स्वत: चहा बनवला आणि त्यात विषारी रसायन टाकले. तो चहा आजी उषा यांना दिला. नातवाने चहा बनवून दिला म्हणून विश्वासाने त्यांनी तो प्यायला. मात्र, चहा पिताच त्यांना दरदरून घाम आला. अंग थंड पडले. बेशुद्ध होऊन बेडवर पडल्या. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रेम याने आजीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली.
घरातील दागिने, रोकड सुरक्षित.. अंगावरील दागिन्यांची चोरी
उषा यांच्या घरातील दागिने, रोकड सुरक्षित होती. त्यांच्या अंगावर जखम नव्हती. प्रथमदर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी सखोल तपास करून खुनाचा छडा लावला.