कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीवर अटीतटीच्या लढतीत सतरापैकी नऊ जागा जिंकत केवळ नशिबाने सत्ताधारी बाणदार गटाला पुन्हा सत्ता मिळाली. विरोधी आघाडीने कडवी झुंज देत आठ जागा मिळविल्या. त्यामुळे मतदारांनी दोन्ही आघाडी नेत्यांना समान अंतरावर ठेवून निर्णय दिल्याने नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
येथील ग्रामपंचायतीसाठी आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात बाणदार विरुद्ध यड्रावकर गट अशीच लढत होत होती. या निवडणुकीत पारंपरिक विरोधक यड्रावकर गटाने बाणदार गटाशी युती करीत निवडणूक स्पर्धेतील हवा काढून घेण्याचा डाव बाणदार गटाने खेळला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बाणदार गटनेते दस्तगीर बाणदार यांच्या संस्थात्मक कारभारावर सभासद विशेषत: शेतकरी वर्ग नाराज होता. याच नाराजीचा विषय घेत सा. रे. पाटील गट, भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विरोधी आघाडी स्थापन करून कडवी झुंज दिली. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी गावातील गैरकारभारावर अंकुश ठेवण्याबरोबरच चांगल्या कामासाठी राजकीय विरोध बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. मतदारांनी दिलेला कौल म्हणजे नेते, उमेदवारांची ही परीक्षाच आहे.
चिठ्ठीवर सत्ता बदलली
या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांचे समसमान सदस्य निवडून आले होते. मात्र, प्रभाग दोनमध्ये चंद्रकांत चव्हाण व संदीप शिंदे यांना समान मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीतून विजयी उमेदवार ठरविल्याने बाणदार गटाचे चव्हाण विजयी झाले आणि या उमेदवाराबरोबर गावची सत्ताही बदलली.