कोल्हापुरात शिंदेसेनेला धक्का, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार करणार राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:42 IST2025-10-07T17:41:03+5:302025-10-07T17:42:59+5:30
मुरगूडमध्ये राजकीय समीकरणे बदलणार

कोल्हापुरात शिंदेसेनेला धक्का, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार करणार राष्ट्रवादीत प्रवेश
मुरगूड : तालुक्यातील सामान्य माणसाला जे न्याय देतील त्यांच्यासोबत राहून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण रणजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्री मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश करत असल्याचे शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी जाहीर केले. तर कोणत्याही इच्छेखातर नव्हे तर मुरगूडचा विकास करण्याची धमक असणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतच कायम तालुक्यात आणि जिल्ह्यात कार्यरत राहणार असल्याचे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.
रविवारी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी मुश्रीफ यांची साथ सोडून भाजपात प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांचे बंधू रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांनी मुश्रीफ गटात जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार, सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत रणजित पाटील आणि राजेखान जमादार हे ५०० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
पाटील म्हणाले, खासदारकीच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांच्यासोबत तर विधानसभेला समरजित घाटगे यांच्यासोबत प्रामाणिक राहिलो. तब्बल ४३ वर्षे संचालक तर चार वर्षे अध्यक्ष पदावर काम करत ‘गोकुळ’मध्ये ठसा उमटवला. परिसरातील सुमारे ५०० तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. मुश्रीफ यांच्यासोबत काही काळासाठी वैरत्व निर्माण झाले. पण सध्या कोणतीही इच्छा न ठेवता त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांसाठी घेतला आहे. भविष्यात जमादार गट, पाटील गट असे काहीही राहणार नाही. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन आपण सर्वच निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचे जमादार यांनी स्पष्ट केले.
संतोष वंडकर यांनी स्वागत केले. यावेळी विश्वजित पाटील, बजरंग सोनुले, अशोक खंडागळे, दत्तात्रय जाधव, अमर सनगर, विशाल सूर्यवंशी, आकाश दरेकर, मधुकर करडे, किरण कुंभार, सुनील चौगले, दत्ता पाटील, रघुनाथ पाटील, एच. के. पाटील, बाबा दिवटनकर, बबन शिंत्रे, सचिन मेंडके उपस्थित होते.
मुश्रीफ यांचा मोठेपणा..
चर्चेदरम्यान मुश्रीफ यांनी आपल्याला तुमचे बंधू प्रवीणसिंह पाटील हे आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला जमवून घ्यावे लागेल, असे राजेखान आणि मला सांगितले होते. आम्हाला कोणाची अडचण असणार नाही. आम्ही आपले नेतृत्व मानून काम करण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केल्याचे रणजितसिंह पाटील यांनी सांगितले.