शिरोळच्या वैकुंठधाम स्मशानभूमीचे रूप पालटणार

By Admin | Updated: December 19, 2014 23:35 IST2014-12-19T21:10:23+5:302014-12-19T23:35:52+5:30

ग्रामपंचायतीचा पुढाकार : ४८ लाख रुपये खर्चाची तरतूद; सहा ठिकाणी शवदाहिनी बांधणार

The shape of the Vaikundhdham crematorium in Shirol will change | शिरोळच्या वैकुंठधाम स्मशानभूमीचे रूप पालटणार

शिरोळच्या वैकुंठधाम स्मशानभूमीचे रूप पालटणार

संदीप बावचे - शिरोळ येथे ग्रामपंचायत निधी, उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळ व अन्य निधींतून सुमारे ४८ लाख रुपये खर्चाच्या या कामातून एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. वैकुंठधाम स्मशानभूमीत सहा ठिकाणी शवदाहिनी बांधण्यात येणार असून, त्याठिकाणी शेड उभारून तीन हजार लोक बसतील अशी बैठक व्यवस्था, शिवाय बगीचा, वृक्ष लागवड, कंपौंड, आदींचा यात समावेश असून, शिरोळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे.
येथे पंचगंगा नदीवर जुन्या कुरुंदवाड रस्त्याकडे शिरोळची स्मशानभूमी आहे. अपुऱ्या स्मशानभूमी शेडमुळे अंत्यविधी किंवा अन्य विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर शेडची दुरवस्था होते. प्रत्येकवेळी खर्च करून या स्मशानशेडची डागडुजी करण्यात येते. गावची लोकसंख्या ४० ते ४५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शिवाय छोट्याशा स्मशानशेडमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात थांबण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे मोठी गैरसोय होते.
शिरोळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निधीबरोबरच उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाच्या निधीशिवाय विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या फंडातील निधी व अन्य निधींतून सुमारे ४८ लाख रुपये खर्चातून एक सुसज्ज स्मशानभूमी तयार केली जात आहे. एकाचवेळी सहा ठिकाणी दहन विधी करता येईल यासाठी शवदाहिनी बांधल्या जाणार आहेत. एकाच वेळी तीन हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यासाठी सुसज्ज शेडही उभारले जाणार आहे. पावसाळ्यात पूर आल्यानंतर विद्युत उपकरणे खराब होऊ नयेत यासाठी वॉटरफ्रूप बल्बदेखील बसविले जाणार आहेत. स्मशानभूमी परिसरात दोन्ही बाजूला झाडे लावण्यात येणार असून, गार्डन व्यवस्था, कंपौंडदेखील बांधण्यात येणार आहे. सध्या सुसज्ज अशी स्मशानभूमी बांधण्याचे काम सुरू असून, निश्चित ग्रामपंचायतीने एक चांगले पाऊल उचलले आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने यापूर्वी गणेश विसर्जनावेळी निर्माल्यकुंड उभारून उपक्रम राबविला होता. याचप्रकारे रक्षाविसर्जनासाठी रक्षाकुंड उभारण्यात येणार आहे. ‘पाच मूठ रक्षा नदीत’ यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण रोखले जाणार आहे.
- पृथ्वीराज यादव,
उपसरपंच शिरोळ


निधी असूनही जिल्ह्यातील अनेक गावांतील स्मशानशेड बांधकामाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. निधी आहे जागा नाही, तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे स्मशानशेडचे बांधकाम होत नसल्याची स्थिती असताना शिरोळ ग्रामपंचायतीने मात्र चांगला पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या पुढाकारात लोकसहभागातून पाठबळ मिळाले, तर परिसराचा विकास होणार आहे.

शिरोळ येथील पंचगंगा नदीकाठी सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे.

Web Title: The shape of the Vaikundhdham crematorium in Shirol will change