Kolhapur: फ्रँचाईजी नावाखाली सतरा जणांना ६२ लाखांचा गंडा; जयसिंगपूरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:55 IST2025-08-25T11:55:12+5:302025-08-25T11:55:34+5:30
फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा

Kolhapur: फ्रँचाईजी नावाखाली सतरा जणांना ६२ लाखांचा गंडा; जयसिंगपूरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल
जयसिंगपूर : फ्रँचाईजी घेऊन कंपनीमध्ये गुंतवणूक करायला लावून जादा नफा दिला जाईल असे सांगून ६२ लाख ८५ हजार ६९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १७ जणांच्या वतीने उत्तम दत्तात्रय निकम (वय ६० रा. आर. के. नगर, पाचगाव, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली.
जिल्ह्यातील १७ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी विजय नाथा जगदाळे, नंदा विजय जगदाळे ( दोघे रा. रेल्वे स्टेशनजवळ स्वप्नवेल अपार्टमेंट जयसिंगपूर), संकेत सूर्यवंशी (रा.पंधरावी गल्ली जयसिंगपूर), सलीम आळतेकर (नांदणी नाका जयसिंगपूर) व सचिन उदगावे (रा. चिंचवाड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. १७ जणांच्या वतीने एकाने फसवणुकीचा हा प्रकार १७ मे ते १६ ऑगस्ट २०२४ या मुदतीत झाला असल्याचे म्हंटले आहे.
झेले चित्रमंदिरजवळ असणाऱ्या आदीसागर अपार्टमेंट येथे व्हीबीएसएल इंडिया कंपनीच्या कार्यालयात वेळोवेळी आरोपी यांनी संगनमत करून कंपनीद्वारे विविध आयुर्वेदिक औषधे, गुणकारी पेये आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तू विक्रीसाठी फ्रंचायजी घेण्याकरिता कंपनीमध्ये ठराविक रक्कम गुंतवण्यास सांगितले होते. कंपनीचे प्रोडक्ट व गाळा भाडे, कामगार पगार व विक्रीमध्ये ३० टक्के नफा दिला जाईल असे सांगून ऑनलाईन, बँकेमार्फत व रोख स्वरूपात गुंतवणूकदार व साक्षीदार यांच्याकडून रक्कम स्वीकारली.
कराराप्रमाणे लाभ न देता मूळ गुंतवणूक केलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे निकम यांनी आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. चौकशीनंतर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा ?
फ्रँचाईजी घेतलेल्या १७ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी एकत्रित फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र जिल्ह्यात शंभरहून अधिक फ्रँचाईजी असल्याचे समजते, त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा आहे.