Kolhapur Crime: २५ हजारांमध्ये बनावट आरसी बुक, कार विकून मोकळे; पोलिसांनी रॅकेट केले उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:39 IST2025-07-05T12:39:07+5:302025-07-05T12:39:23+5:30

खरेदी केलेल्यांना जबर फटका, आरटीओ एजंटाचा सहभाग

Selling expensive cars to the original owner by creating a fake RC book in kolhapur | Kolhapur Crime: २५ हजारांमध्ये बनावट आरसी बुक, कार विकून मोकळे; पोलिसांनी रॅकेट केले उघड 

Kolhapur Crime: २५ हजारांमध्ये बनावट आरसी बुक, कार विकून मोकळे; पोलिसांनी रॅकेट केले उघड 

कोल्हापूर : पंचवीस हजार ते चार हजार रुपयात बनावट आरसी बुक तयार करून देत मूळ मालकाच्या महागड्या कार परस्पर विक्री करून फसवणाऱ्यांची टोळी राज्यात सक्रिय असल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या एका गुन्ह्याच्या तपासातून निष्पन्न झाले.

टेंबलाईवाडीतील सागर देसाई यांच्या मालकीच्या तीन कार खोटी कागदपत्रे तयार करून विकलेल्या सहा जणांना अटक केल्यानंतर आरसी बुक तयार करणाऱ्यांची बनावटगिरीही उघड झाली. या बनावटगिरीत आरटीओ एजंट, जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे दलाल आहेत. अशा टोळीचे मुख्य केंद्र भिवंडी येथे असल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे.

देसाई यांनी तीन क्रेटा कार, एक फॉर्च्युनर कार परस्पर विकल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संशयित आरोपी नीलेश सुर्वे व हसन जहांगीरदार यांना शाहूपुरी पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर टीटी फार्मवर फिर्यादी देसाई यांच्या बनावट सह्या करून मुंबई सेंट्रल ताडदेव आरटीओ कार्यालयातून बनावट आरसीव्दारे कार विकल्याचे समोर आले.

एजंट मोहम्मद कुरेशी याने २५ हजार रुपयांस प्रत्येकी एक बनावट आरसी बुक तयार करून दोन क्रेटा कार छत्रपती संभाजीनगर येथे, एक क्रेटा कार पुणे, एक फॉर्च्युनर कार नागपूर येथे विक्री झाल्याचे पोलिसांना आढळून आले.

कुरेशी यास अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने आरोपी शेख याच्याकडून आरसी बुक प्रत्येकी १० हजार रुपये किमतीस बनवून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शेख याला भिवंडीतून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आरोपी शहजामा खान याच्याकडून प्रत्येकी आठ हजार रुपयास एक बनावट आरसी बुक तयार करून दिल्याचे सांगितले.

खान यास पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले. त्याने त्याचा मित्र आरोपी शेख आसेफ याच्या फोटो स्टुडिओतून बनावट आरसीबुक तयार केल्याचे पोलिसांना सांगितले. यासाठी प्रत्येक आरसी बुकला चार हजार दिले. शेख यास ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. घरात बनावट आरसी बुक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले. पोलिसांनी बनावट कागदपत्रव्दारे परस्पर विक्री केलेल्या तीन कार जप्त केल्या. एक कार जप्त करण्याची प्रकिया सुरू केली आहे.

आणखी तीन कार विक्री केल्याचा संशय

अटकेतील सहाही संशयितांना उद्या, शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या आरोपींनी न्यू शाहूपुरीतील जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणारे प्रशांत सुकुमार पाटील यांच्याही तीन महागड्या कार बनावट आरसीबुक तयार करून परस्पर विकल्याचा संशय पोलिसांना आला आहे. त्या कार कोठे विकल्या आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस म्हणतात ही काळजी घ्या..

जुनी कार खरेदी करताना मूळ मालक समोर असेल तरच खरेदी-विक्रीचा व्यवहार करावा. एजंट किंवा अन्य त्रयस्थाकडून वाहन खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी केले आहे.

खरेदी केलेल्यांना जबर फटका

या प्रकरणात दोन क्रेटा कार २४ लाख आणि एक फॉर्च्युनर कार चोवीस लाखांना खरेदी केली होती. कार दुसऱ्याच्या नावावर करताना मूळ मालकास ओटीपी जातो. त्यामुळे आरोपींनी बनावट आरसी बुकमध्ये मोबाइल नंबर बदलून घेतला. त्याव्दारे कार खरेदी केलेल्यांच्या नावे करून दिले. पण पोलिसांनी कार घेतलेल्या तिघांकडून तिन्ही कार जप्त केल्या. यामुळे कार घेतलेल्यांना जबर फटका बसला आहे. जप्त केलेल्या कार सांगली आणि कोल्हापूर पासिंगच्या आहेत.

Web Title: Selling expensive cars to the original owner by creating a fake RC book in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.